Solapur Pandharpur News : गोरगरीब अन् कष्टकरी भक्तांचा देव असणाऱ्या विठुरायाच्या चरणी एका 80 वर्षाच्या आजीबाईने आपल्या आयुष्याची पुंजी अर्पण करत इच्छा पूर्ण केली आहे. आयुष्यभर काबाडकष्ट करून शेळ्या मेंढ्याच्या मागे जीवन घालवलेल्या 80 वर्षीय फुलाबाई चव्हाण यांनी देवाच्या चरणी एक लाख 11 हजार रुपयांची देणगी दिली आहे. तसे विठुरायाला रोजच वेगवेगळ्या पद्धतीचे दान येत असते. कोणी दोन कोटीचे सोन्याचे दागिने अर्पण करतात तर कोण कोटभर रुपयाची आलेली पॉलिसी रक्कम अर्पण करतात. मात्र यात फुलाबाई यांनी दिलेल्या या दानाचे महत्व काकणभर सरसच ठरेल . 


फुलाबाई यांनी आयुष्यभर मजुरी करत आपल्या मुलांना मोठे केले. यानंतरच्या काळात देखील त्यांनी शेळ्या मेंढ्या सांभाळून प्रपंच नेटका केला. मात्र हे सर्व होत असताना त्यांची विठुरायावरची निष्ठा अतिशय अढळ राहिली.  कालांतराने मुले मोठी झाली, नातवंडे पैसे मिळवू लागली. आता चांगले दिवस विठ्ठलाच्या कृपेने आल्याची भावना फुलाबाई यांची होती. म्हणूनच त्यांनी आयुष्यभर जमा केलेली पुंजी देवाला अर्पण करण्याचे ठरविले. 


तसे त्यांना दोन दिवसापूर्वी देव स्वप्नात आल्याचे ते सांगतात. काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी असल्याचे देवाचे शब्द त्यांच्या आजही कानात असल्याचे त्या सांगतात. यानंतर त्यांनी आपल्या मोठ्या मुलाला म्हणजे भारत याला बोलावून जवळ असणारे सोने मोडायला दिले. यातून आलेले 70 हजार रुपये आणि  बोकड विकून आलेले 50 हजार रुपये घेऊन थेट पंढरपूर गाठले. यावेळी मोठा मुलगा आपल्या आईला स्वतःचे पैसे देतो असे सांगत होता, पण माझ्या विठ्ठलाला माझेच सर्व पैसे द्यायचे असे सांगून आजीने विठ्ठल मंदिरात येऊन 1 लाख 11 हजार रुपयांची पावती करत आपली इच्छा पूर्ण केली. 


जवळचे सर्व देवाला वाहिल्यावर काळजी वाटत नाही का विचारताच माझ्या देवानेच मला सगळे दिले आणि पुढेही तोच देत राहणार अशी प्रतिक्रिया आजीबाईंनी दिली. तसेच आता मी समाधानी असल्याचे त्या सांगतात. हे पैसे अर्पण केल्यावर डोक्यावरचे ओझे उतरल्यासारखे वाटत असल्याच्या त्या सांगतात. हे सांगतानाही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपू शकत नाही. या जीवनात प्रत्येकवेळी माझा पांडूरंग माझ्या सोबत होता आणि पुढेही असेल असे सांगत आपली इच्छा देवाने पूर्ण केल्याने समाधानी आहे, आता डोळे मिटायला मोकळी अशा भाषेत त्या आपले समाधान व्यक्त करतात.