Solapur News : काळ बदलला तरी अंधश्रद्धेचा (Superstition) विळखा अजूनही किती घट्ट आहे याची प्रचिती देणारी धक्कादायक घटना सोलापुरात (Solapur) उघडकीस आली आहे. सोलापुरातल्या गोदुताई घरकुल परिसरात अमावस्या (Amavasya) असल्याने घरमालकाने भाडेकरुचा मृतदेह (Dead Body) घरात घेण्यास नकार दिला. त्यामुळे भाडेकरुचा (Tenant) मृतदेह रात्रभर तसाच पावसात भिजत असल्याचे फोटो समोर आले आहेत.  


अमावस्या असल्याने मृतदेह घरात आणू दिला नसल्याचा आरोप


शहरापासून काही अंतरावर असलेल्या या घरकुल परिसरात राहणाऱ्या शंकर यल्लप्पा मुटकिरी यांचा मृत्यू रुग्णालयात झाला. पण मृतदेह रुग्णालयातून घरी आणण्यात आला त्यादिवशी अमावस्या आहे. त्यामुळे घर मालकाने मृतदेह घरात आणू दिला नसल्याचा आरोप होत आहे. मृत्यू झालेल्या शंकर मुटकिरी यांची आई नागमणी मुटकिरी या वृद्ध आणि भाऊ अनिल मुटकिरी हा दिव्यांग असल्याने रात्रीच अंत्यसंस्कार करणे अवघड होते. त्यामुळे वृद्ध आई आणि दिव्यांग भावावर मृतदेह तसाच रात्रभर घराबाहेर पावसात ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली. या घटनेची माहिती मिळताच गोदुताई विडी घरकुल परिसरात सामाजिक कार्य करणाऱ्या वसीम मुल्ला, विल्यम ससाणे आणि इतर नागरिकांनी मंगळवारी शंकर मुटकिरी यांचा अंत्यविधी केला. 


मृतदेह रात्रभर पावसात भिजत ठेवण्याची वेळ


शंकर मुटकिरी हे शिलाई कामगार म्हणून काम करत होते. तर गोदुताई विडी घरकुल परिसरात भाड्याने आपल्या वृद्ध आई आणि दिव्यांग भावासोबत राहत होते. शंकर यांना अचानक पॅरालिसिसचा अटॅक आल्याने परिसरातील नागरिकांनी रुग्णवाहिका बोलवून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र सोमवारी दुपारी उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अंत्यविधीपूर्वी मृतदेह घरासमोर आणल्यानंतर घरमालकाने मृतदेह घरात घेऊन जाण्यास परवानगी दिली नाही. अमावस्या आहे. आम्हाला चालत नाही अशी आडकाठी घेतल्यामुळे मृतदेह घराबाहेरच ठेवावा लागला. सोमवारी रात्रभर पावसात भिजत मृतदेह बाहेर ठेवण्यात आला होता. 


सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने अंत्यसंस्कार


भाऊ दिव्यांग आणि आई वृद्ध असल्याने शंकर हे घरात कमावणारे एकटेच होते. परिस्थिती हालाखीची होती. त्यामुळे त्यांच्यावर अंत्यविधी करण्याइतके पैसे देखील मुटकिरी कुटुंबाकडे नव्हते. मंगळवारी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गोदुताई विडी घरकुल गृहनिर्माण सोसायटीच्या निधीतून शंकरवर अंत्यसंस्कार केले.


हेही वाचा


Crime News : दहावीतील विद्यार्थ्याने नववीतील मुलाकडून उकळले तब्बल 10 लाख रुपये, सोलापुरातील घटना