Solapur Latest Crime News Update : सोलापुरात दहावीत शिकणाऱ्या मुलाने नववीतील विद्यार्थ्याला धमकावून टप्प्याटप्याने दहा लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात सोलापूरच्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात सोमवारी (10 जुलै) रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून दहा लाख रुपये उकळणाऱ्या मुलाच्या एका नातेवाईकाला देखील पोलिसानी अटक केलीय. तर दहावीच्या विद्यार्थ्यास ताब्यात घेतले असून बालसुधार गृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी पैसे उकळण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे.


या घटनेतील फिर्यादी ह्या एका शाळेत शिक्षिका आहेत. त्यांच्या वडिलांनी निवृत्तीच्या रकमेतून 5 लाख रुपये दिले होते. त्यात भर टाकून फिर्यादी शिक्षिका यांनी 11 लाख 25 रुपये घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले होते. लॉकरची चावी ही कपाटातच ठेवलेली होती. ही रक्कम त्यांनी डिसेंबर 2022 मध्ये मोजली होती. त्यानंतर एप्रिल 2023 मध्ये पैसे मोजल्यानंतर कपाटात फक्त एक लाख रुपये होते. यामुळे त्यांनी मुलांची चौकशी केल्यानंतरही घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यांनी जुलै महिन्यात पोलिसांकडे येऊन फिर्याद दिली.


फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, घरातील कपाटात पैसे असल्याची माहिती त्यांच्या मुलाला होती. सुरुवातीला त्याने त्या कपाटातून काही पैसे घेऊन खर्च केले. त्यानंतर त्याच्या शाळेत दहावीत शिकणाऱ्या मित्राला देखील त्याने काही पैसे दिले. एके दिवशी आरोपी अल्पवयीन मुलाने उसने पैशांची मागणी केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या मुलाने आरोपी मुलाला काही पैसे उसने दिले. त्यानंतर कही दिवसांनी पुन्हा त्या दहावीतील मुलाने पैशांची मागणी केल्यानंतर फिर्यादीच्या मुलाने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे दहावीतील मुलाने त्याला ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे फिर्यादीचा मुलगा घाबरला. त्याने सुरुवातील पाच हजार रुपये त्याच्या मित्राला दिले. त्यानंतर अशाच प्रकारे धमकी देत पैशाची मागणी सुरु ठेवल्यामुळे टप्याटप्याने त्या दहावीतील मुलाला 8 लाख रुपये दिले.


काही दिवसांपूर्वी दहावीतील मुलाने आपल्या नातेवाइकालाही याची माहिती दिली. त्या नातेवाइकाने फिर्यादीच्या मुलाला धमकावून 2 लाख रुपये घेतले. अशा प्रकारे तब्बल 10 लाख रुपये आरोपी अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या नातेवाईकाने उकळल्याची फिर्याद पोलिसांत देण्यात आली आहे. याप्रकरणी दहावीतील एका मुलाला आणि त्याच्या नातेवाईक आकाश खेड याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


दरम्यान पोलिसांनी आरोपी आकाश खेड याला अटक केली असून त्याला न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तर अल्पवयीन आरोपीची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील पैसे आरोपीनी कुठे खर्च केले? फिर्यादी महिलेने ही घटना पोलिसात लवकर का कळवली नाही? अशा सर्व बाजूने तपास पोलिस करत आहेत. जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.