पंढरपूर : दोन आठवड्यापूर्वी पंढरपूरचे साखर कारखानदार (Pandharpur News) अभिजीत पाटील (Abhijeet Patil) आणि सोलापूरच्या अश्विनी हॅस्पीटलचे प्रमुख बिपीन पटेल यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाचे छापे पडले होते. त्या छाप्यात 100 कोटीहून अधिक रक्कमेची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. 43 कोटी जप्त करण्यात आले आहेत.
प्राप्तिकर विभागाने 25 ऑगस्टला वाळू उत्खनन, साखर उत्पादन, रस्ते बांधकाम, आरोग्यसेवा, वैद्यकीय महाविद्यालय चालवणे इत्यादी व्यवसायात गुंतलेल्या अभिजीत पाटील आणि बिपीन पटेल यांच्याशी निगडीत ठिकाणी शोध आणि जप्तीची कारवाई केली. या शोध मोहिमेत 20 हून अधिक ठिकाणी हे छापे पडले. महाराष्ट्रातील सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात ही कारवाई झाली.
काय नेमके सापडले?
या शोध मोहिमेदरम्यान, हार्ड कॉपी दस्तऐवज आणि डिजिटल डेटाच्या रूपात मोठ्या प्रमाणात पुरावे सापडले आहेत. हे सगळे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या पुराव्यांवरून या व्यावसायीकांनी अवलंबलेल्या करचुकवेगिरीच्या विविध पद्धती उघड झाल्यात. ज्यात बोगस खर्चाचे बुकिंग, अघोषित रोख विक्री, अस्पष्ट कर्ज, क्रेडिट नोंदी आहेत.
साखर कारखान्यावरच्या कारवाईत काय सापडले?
वाळू उत्खनन आणि साखर उत्पादनात गुंतलेल्या गटाच्या बाबतीत 15 कोटीपेक्षा जास्त साखरेच्या बेहिशेबी रोख विक्रीचे कागदोपत्री पुरावे सापडले आहेत. 15 कोटी जप्त करण्यात आलेत. या शोध कारवाईतून असे समोर आले आहे की, या गटाने आपल्या खात्यांच्या वहीत बोगस असुरक्षित कर्जाच्या स्वरूपात आपले बेहिशेबी उत्पन्न सादर केले आहे. समूहाच्या अनेक कर्जदारांनी, तसेच समूहाच्या प्रवर्तकांनी हे मान्य केले आहे की समूहाने 10 कोटी पेक्षा जास्त बेहिशेबी रोकड निर्माण केली आहे. अशाप्रकारे 10 कोटी रुपये जप्त करण्यात आलेत. या शिवाय सुमारे 43 कोटीच्या भांडवली नफ्याचे पुरावे, नॉन-फाइलर कॉर्पोरेट संस्थेच्या मालमत्तेच्या विक्रीवर 43 कोटी रुपये देखील जप्त करण्यात आले आहेत.
वैद्यकीय व्यावसायीकांकडे काय सापडले?
आरोग्य सेवा आणि वैद्यकीय महाविद्यालय चालवण्याच्या व्यवसायात गुंतलेल्या दुसऱ्या गटाकडे काही बाबी आढळून आल्यात. रस्ते बांधकाम, कॅपिटेशन फी आणि डॉक्टर, पीजी विद्यार्थ्यांना दिलेला पगार आणि स्टायपेंड यांचा परतावा दर्शविणाऱ्या बोगस रोख पावत्यांचे पुरावे आढळले आहेत. या शिवाय बोगस खर्चाचे बुकिंग आणि कंत्राटी पद्धतीने 35 कोटींची देयके पुरावे सापडले आहेत आणि जप्त करण्यात आले आहेत. या गटाचे अघोषित 35 कोटी जप्त करण्यात आले आहेत.
आत्तापर्यंत किती संपत्ती आढळली?
आतापर्यंत या शोध मोहिमेत 50 कोटींहून अधिकचे बेहिशेबी उत्पन्न सापडले आहे. 100 कोटी पुढे अघोषित मालमत्ता सापडली आहे. 5 कोटींचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.