Solapur Watermelon Price : उन्हाळ्यात कलिंगडला (Watermelon) मोठी मागणी असते. बाजारात 50 रुपयांना विकलं जाणारं कलिंगड सोलापूर कृषी बाजार समितीमध्ये (Solapur Krushi Utpanna Bazar Samiti) मात्र अवघ्या 80 पैशांना विकलं गेलं. तीन टन कलिंगडला केवळ 3400 रुपये मिळाल्याने शेतकरी उद्विग्न झाला. करमाळ्यातील बिटरगाव वांगी गावातील रामभाऊ रोडगे या शेतकऱ्याच्या बाबतीत हा प्रकार घडला. बाजार समितीने क्रेट पद्धत बंद करुन किलोवर कलिंगड घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.


तोडणी मजुरी, टेम्पो भाड्याचे 4560 रुपये देऊन रामभाऊ रोडगे परतले!


कलिंगडला मार्केटमध्ये सध्या चढे दर मिळत असले तरी बाजार समितीमध्ये मात्र मातीमोल किमतीने कलिंगडाची खरेदी होऊ लागली आहे. 3 टन कलिंगड विक्रीला नेलेल्या शेतकऱ्याला 4560 रुपयांची पदरमोड करण्याची वेळ आली आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये सध्या सुरु असलेली क्रेट पद्धत बंद करुन किलोवर कलिंगडाची खरेदी करण्याची मागणी शेतकरी करीत आहे. सोलापूरच्या (Solapur) करमाळा तालुक्यातील  बिटरगाव वांगी येथील रामभाऊ रोडगे या शेतकऱ्याला तीन क्विंटल कलिंगड विक्रीनंतर अवघे 3400 रुपये मिळाले आहेत. हा दर म्हणजे 80 पैसे प्रति किलो दराने आहे. यामुळे पदरमोड तोडणी मजुरी आणि टेम्पो भाड्याचा खर्च भागवायला देखील रामभाऊ रोडगे यांना खिशातून 4560 रुपये भरुन घरी परतावे लागले आहे.


आतातरी शासनाने शेतमालाला हमीभाव द्यावा : रामभाऊ रोडगे


रामभाऊ रोडगे यांची तीन एकर शेती असून यात त्यांनी दोन एकरावर कलिंगडची लागवड केली आहे. त्यांना यासाठी एक लाख 20 हजार रुपयांचा खर्च आला. यातील तीन टन कलिंगड त्यांनी विक्रीसाठी सोलापूर बाजार समितीत आणले होते. हे तीन टन कलिंगड काढण्यासाठी मजुरी अडीच हजार रुपये, गाडी भाडे साडे चार हजार रुपये, हमाली 960 रुपये, असा एकूण सात हजार नऊशे साठ रुपये खर्च आला. या कलिंगडची पट्टी मात्र केवळ 3400 रुपये आल्याने रोडगे याना धक्काच बसला आहे. मालाची पट्टी पाहून औषधाची बाटली विकत घेण्याची इच्छा होत असून आतातरी शासनाने शेतकऱ्यांचा विचार करावा आणि शेतमालाला हमीभाव द्यावा अशी मागणी रामभाऊ रोडगे यांनी केली आहे.  


10 पोते कांदा विकल्यावर शेतकऱ्याला मिळाले फक्त दोन रुपये... ते ही चेकद्वारे..!


याआधी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत असाच काहीसा प्रकार कांदा दराच्या बाबती घडला होता. 10 पोती कांद्यांची विक्री केल्यावर शेतकऱ्याला फक्त दोन रुपये मिळाले. ते पैसेही चेक स्वरुपात देण्यात आले. राजेंद्र तुकाराम चव्हाण असं या शेतकऱ्याचे नाव आहे. 10 पोती कांद्याची विक्री करुन शेतकऱ्याला 512 रुपये मिळाले होते. मोटारभाडे, हमाली, तोलाई असा सगळा खर्च 510 रुपये आला. शेतकऱ्याला फक्त दोन रुपये मिळाले. 


हेही वाचा


Watermelon Price: कलिंगडाच्या दरात मोठी घसरण, तळकोकणातील बळीराजा अडचणीत; कलिंगड शेतातच पडून