सोलापूर : सोलापूर (Solapur News) जिल्हाधिकारी कार्यालयात (Solapur Collector Office) स्वातंत्र्य दिनाचा सोहळा सुरु असतानाच एका शेतकऱ्याने (Farmer) आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच सावध होत शेतकऱ्याला ताब्यात घेतले अन्यथा मोठी घटना घडली असती. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी येथील रहिवासी ज्ञानेश्वर भारत पाटील असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. लोकमंगल सहकारी बँकेकडून घेतलेले कर्ज परतफेड करुन देखील सातबारावरील बोजा न उतरवल्याने शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात एकीकडे ध्वजारोहण झाले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे भाषण सुरू होते. त्याचवेळेस ज्ञानेश्वर पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्वतःवर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गोंधळ उडाला. प्रवेशद्वारावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला रोखत ताब्यात घेतलं. तसेच सोलापूर शहर सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड, सोलापूर ग्रामीण पोलीस उपधिक्षक अमोल भारती यांनी देखील लगेचच धाव घेतं शेतकऱ्याला आत्मदहनापासून रोखले. पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतं या शेतकऱ्याला रिक्षाद्वारे सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात नेलं.
पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर पाटील याने हे कृत्य का केलं या बाबत विचारणा केली. शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 3 वर्षांपूर्वी लोकमंगल सहकारी बँकेकडून 40 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. टप्याटप्याने त्यांनी या कर्जाची परतफेड देखील केली. कर्जाची परतफेड होऊन देखील सात बारा उताऱ्यावर असलेला बँकेचा बोजा हा अद्याप उतरवलेला नाही. त्यामुळेचं स्वातंत्र्य दिनानिमित्त आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं. 'या संदर्भात मी प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिले आहे. मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ते देखील करू दिलेलं नाही. मी पैसे परतफेड केलेत, त्यामुळे माझा उतारा कोरा व्हावा एवढीच माझी मागणी आहे.' अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर पाटील याने दिली.
पोलिसांनी केली प्रतिबंधात्मक कारवाई, न्यायालयात जामीन
ज्ञानेश्वर पाटील याने आत्मदहनचा प्रयत्न केल्याने सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात CRPC 151(3) नुसार प्रतिबंधत्मक कारवाई केली. शेतकऱ्याला अटक करून पोलिसांनी सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयाने वैयक्तिक जातमुचलक्यावर ज्ञानेश्वर पाटील यांना जामीन मंजूर केला.
सातबारावरील बोजा कसा कमी होतो?
बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावरील बोजा कमी करण्यासाठी बँकेकडून कार्यालयाला पत्र (NOC, ना हरकत पत्र) दिले जाते. या पत्रावर संबंधित शेतकऱ्याचा पूर्ण तपशील, शेतीचा गट क्रमांक, कर्जाचा तपशील तसेच बोजा उतरवण्यास हरकत नसल्याचे नमूद केलेले असते. तलाठी कार्यालयाला हे पत्र प्राप्त झाल्यानंतर संबंधित तलाठी ही जाहीर नोटीस काढतात. या नोटीसीवर कोणी हरकत घेतली नाही तर प्रकरण मंडळ निरीक्षकांकडे पाठविले जाते. मंडळ निरीक्षक याची नोंद घेऊन संबंधित उताऱ्यावरील बोजा उतरवत असतात. तलाठी यांनी काढलेल्या नोटीसीपासून सर्कल अधिकारी यांनी घेतलेल्या नोंदी पर्यंत सोळा दिवसात प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. अशी माहिती महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजकुमार पांडेकर यांनी एबीपी माझा शी बोलताना दिली.