सोलापूर : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. सोलापुरातही गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे सोलापुरात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी झाला आहे. सोलापुरात वेगवेगळ्या गावामध्ये वीज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय एक व्यक्ती जखमी झाला असून दोन शेळ्या दगावल्या आहेत. 


वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 2 जणांचा मृत्यू, एक जखमी


दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुर्देहळळी गावात वीज कोसळ्याने आमसिद्ध गायकवाड या  67 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून गायकवाड यांच्या दोन शेळ्याही दगावल्या आहेत. कुंभारी गावात बिळेणी डक्के या 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वीज पडल्यानेच डक्के यांचा मृत्यू झाल्याची माहिती  ग्रामस्थांनी दिली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवल्याची माहिती  पोलिसांनी दिली आहे. तर दोड्डी गावात वीज कोसळल्याने शंकर राठोड हे वृद्ध व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी राठोड यांना उपचारसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे


सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी


रोहिणी नक्षत्राने सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 91 पैकी 82 महसुली मंडळांत 5 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील नरखेड परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. मागील दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मलिकपेठ, हिंगणी, बोपले या भागातील कोरड्याठाक पडलेल्या शेतांचे बांध फुटून पाणी वाहू लागलं आहे. दुष्काळसदृश्य भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजाला दिलासा मिळाला आहे.


पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित


उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ  आणि करमाळ्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याचं दिसत आहे. जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात मागील दोन दिवसांत तीन-चार मंडळ वगळता इतर मंडळांत पाऊस पडला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी 102.5 मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. आतापर्यंत 30.7 मि.मी. पाऊस पडला असून जवळपास 30 टक्के इतका पाऊस 5 जूनपर्यंत पडला आहे.


मुसळधार पावसामुळे ओढे-नाले वाहू लागले


सोलापूर शहरात पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात  झाली आहे. मागील अनेक दिवसापासून सोलापूरकरांना पावसाची प्रतीक्षा होती, पावसाने बळीराजा सुखावणार आहे. मोहोळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे ओढे-नाले वाहू लागले आहेत. मुसळधार पावसामुळे वैराग - मोहोळ मार्ग खचला असून रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळालं. नरखेड ते मोहोळ दरम्यानची वाहतूक काही काळ खोळंबली होती, नंतर ती पुन्हा सुरु झाली.