Solapur News : सोलापूर (Solapur) , नगर आणि पुणे जिल्ह्यातील वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणाने (Ujani Dam) तळ गाठला आहे. पाऊस लांबल्यामुळे उजनी धरणाच्या पाणीपातळी महिनाभर आधीच वजा स्थितीत गेली होती. सध्या उजनी धरणाचा पाणीसाठा उणे 36 टक्के पर्यंत खालावला आहे. त्यामुळे तात्काळ जलाशयातील पाणी उपशावर निर्बंध न आणल्यास  पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरण वजा 30 टक्के कमी पाणी पातळीत असल्याने आणखी चिंता वाढल्याचं चित्र आहे. 


उजनी धरण हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे. सोलापूर महापालिकेसह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, कुर्डूवाडी, बार्शी, जेऊर, करमाळा , उस्मानाबाद , राशीन, कर्जत, दौंड, इंदापूर, भिगवण आणि बारामती शहराचा काही भाग याच उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहे. याशिवाय नदीकाठची 100 गावे आणि जलाशय शेजारी असणाऱ्या 81 गावांचा पाणीपुरवठा देखील उजनीवर अवलंबून आहेत. शिवाय 10 ते 12 साखर कारखाने आणि 6 ते 7 औद्योगिक वसाहतीला देखील उजनी धरणातून पाणी पुरवठा होत असतो. 


मात्र जलाशयाची पाणी पातळी घटू लागल्याने याचा फटका या शहरांना आणि पाणीपुरवठ्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना बसणार आहे. सध्या सोलापूर, पंढरपूर, सांगोला वगैरे शहरांना नुकताच उजनीतून पाणी पुरवठा केल्याने पुढील दीड ते दोन महिने या गावांची तहान भागली आहे. मात्र आता जसा जसा जलसाठा कमी होत जाईल तसे या शहरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. 


कोणत्या शहराला कसा बसणार फटका? 


उजनी धरणातील पाणी पातळीत घट झाल्यास सगळ्यात पहिला फटका हा जेऊर आणि 29 गावांना बसणार आहे.  जर धरणातील पाणीसाठा वजा 44 टक्के झाला तर करमाळा , राशीन , कर्जत या गावांना मिळणे बंद होईल. त्यानंतर धरणातील पाण्याची पातळी 56 टक्क्यांपर्यंत घसरली तर सोलापूर शहर,  बार्शी, कुर्डुवाडी आणि टेंभुर्णी या शहरांना  फटका बसणार आहे . जर धरण 62 टक्के पर्यंत खलावले तर धाराशिवच्या पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. धरण वजा 73 टक्केवारी गेल्यास इंदापूर ,बारामती एमआयडीसी यांचा पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता आहे .


सोलापूर शहराचा पाणीपुरवठा उजनीवरच अवलंबून असून नागरिकांची तहान भागविण्यासाठी स्वत:चा कोणताही शाश्वत स्त्रोत महापालिकेकडे उपलब्ध नाही. पाऊस लांबल्याने आता नागरिकांची चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे जलाशयातील पाणी उपशाला  पूर्ण निर्बंध आणल्यास जवळपास  30 ते 32 लाख नागरिकांच्या पिण्याक्या पाण्याचा प्रश्न सुटू शकणार आहे.  मात्र याबाबत तातडीने निर्णय घ्यावे लागणार असून पाणी उपसा बंद झाला तर पाऊस सुरू होईपर्यंत चिंता राहणार नाही.


तर आगामी 25 ते 30 दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास धरणातून नदीद्वारे पाणी सोडावे लागेल, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता या भागातील सर्वांना पावसाची प्रतिक्षा आहे. धरणात सध्या मृत पाणीसाठा 44 टीएमसी आहे, पण त्यात 14 ते 14 टीएमसी गाळ आहे.