Solapur News : शिक्षकाचा नवीन कार घेतल्याचा आनंद गगनात मावत नव्हता, पण याच आनंदाला कुठे तरी दृष्ट लागली असावी असं म्हणता येईल. नवी कोरी कार घेतली म्हणून मेहुण्याला पेढे देण्यासाठी गेलेल्या शिक्षकाबाबत होत्याचं नव्हतं झालं. एकाच क्षणात घात झाला. सोलापुरातील भाटेवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली. काय घडलं नेमकं?



कार घेऊन पाच ते सहा दिवस झाले होते
सोलापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक या पदावर कार्यरत असलेल्या ईरन्ना बसप्पा जूजगार ( वय 41 वर्ष, रा. मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड सोलापूर) या शिक्षकाने नवीन कार घेतली होती. कार घेऊन पाच ते सहा दिवस झाले होते. घरात पहिल्यांदाच चार चाकी वाहन आल्याने शिक्षकाचा आनंद गगनात मावत नव्हता. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी ईरन्ना जूजगार संपूर्ण कुटुंबासहित आपली नवीन कार घेऊन रविवारी मेहुण्याच्या घरी पेढे द्यायला गेले होते. पण त्याच दिवशी त्यांच्या सोबत घात झाला.



...आणि अचानक गाडीवरील नियंत्रण सुटलं 
कार चालवायला येत नसल्याने ईरन्ना सोबत एक खाजगी वाहनचालक देखील घेऊन गेले होते. उत्तर सोलापुरातील डोणगाव जवळील भाटेवाडी गावात पोहोचल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य घरात गेले. यावेळी खासगी वाहन चालक देखील गाडीतून उतरले होते. घरासमोर मोकळी जागा असल्याने ईरन्ना यांनी गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. यावेळी गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट शिवारातील विहिरीत पडली.


 


ग्रामस्थांनी थेट विहिरीत उड्या मारल्या


कार जेव्हा विहिरीत पडली, तेव्हा जवळ असलेल्या कुटुंबियांनी आरडाओरडा केला, गावातील ग्रामस्थांनी देखील थेट विहिरीत उड्या मारल्या. जवळपास तासाभरानंतर ईरन्ना यांना नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी त्यांना विहिरीतून बाहेर काढलं. बेशुद्ध अवस्थेत इरन्ना यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत्यू झाल्याचे घोषित केले. 



या घटनेने सर्वत्र हळहळ
मयत शिक्षक ईरन्ना यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ईरन्ना जुजगार हे सोलापूर जिल्ह्यातील वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक होते. त्यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील मैंदर्गी आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे. रविवारी दुपारी शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची आणि मित्रमंडळीची मोठी गर्दी झाली होती. 


 


इतर महत्त्वाच्या बातम्या


350 एकर परिसर, 30 हजार फ्लॅट्स, सोलापुरात उभारली देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत