सोलापूर : सोलापुरच्या (Solapur) पालकमंत्री पदाचा भार स्विकारल्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. तर या पदाधिकाऱ्याने काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी देखील केली. यावेळी या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अजय असं या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. सरकारी नोकऱ्यांमधलं खासगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करण्याची मागणी या पदाधिकाऱ्याने केली असल्याचं सांगण्यात येत आहे.
चंद्रकांत पाटील हे पुढील दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर हा शाईफेकीचा प्रयत्न करण्यात आला. तर यावेळी कंत्राटी भरती विरोधात या पदाधिकाऱ्याने घोषणाबाजी देखील केली. तर त्याने घोषणाबाजी तर काळे झेंडे दाखवण्याचा देखील प्रयत्न केला. चंद्रकांत पाटील येणार म्हणून याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. पण त्यामधून या पदाधिकाऱ्याने पुढे जात शाईफेक करण्याचा प्रयत्न केला.
चंद्रकांत पाटील झाली होती शाईफेक
याआधी पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच पेटलं होतं. तर ठिकठिकाणी आंदोलनं देखील करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
राधाकृष्ण विखे पाटलांवर उधळला होता भंडारा
काहीच दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शासकीय विश्रामगृहामध्ये भंडारा उधळण्यात आला होता. धनगर आरक्षणाच्या मागणीवरुन हा भंडारा विखे पाटलांवर उधळला गेला होता. तर विखे पाटलांवर ज्याने भंडारा उधळला होता, त्या शेखर भंगाळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
त्याच पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. कोणत्याही प्रकारे आंदोलन होणार नाही, याची काळजी पोलिसांनी घेतली होती. परंतु तरीही भीम आर्मीच्या या पदाधिकाऱ्याने मार्ग काढत कंत्राटी पद्धतीचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेऊन सदर बाजार पोलिस स्थानकात नेण्यात आले आहे. तर चंद्रकांत पाटील हे आता शासकीय विश्रामगृहामध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या कंत्राटी भरती प्रक्रियेचा राज्यभरातून विरोध करण्यात येत आहे. त्याचाच विरोध करत या पदाधिकाऱ्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा :