सोलापूर: शिक्षक आणि विद्यार्थी या गुरुशिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याचे काम सांगोला तालुक्यातील कोला येथील एका शिक्षकाने केल्याचा प्रकार घडला आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकाला पॉस्को कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. सांगोला तालुक्यातील कोला येथील कोला विद्यामंदिर हायस्कुलमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


या शाळेमध्ये 28 ते 30 डिसेंबर या कालावधीत शाळेचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी या शाळेतील शिक्षक शत्रुघ्न भांगरे याने नववीत शिकणाऱ्या मुलीला स्नेहसंमेलन कार्यक्रम सुरु असताना कवितेची वही देण्यासाठी स्टेजमागील वर्गात बोलावले होते. ही मुलगी शिक्षकाकडे गेली असता त्याने या मुलीचा विनयभंग करताना शाळेतील एका शिक्षकाने पहिले देखील होते. या मुलीने घरी जाऊन आपल्या पालकांकडे याबाबत तक्रार केली असता पालकांनी शाळेकडे विचारणा केली. 


ही घटना घडल्यानंतर 18 दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक रफिक मणेरी यांनी सांगोला पोलिसात लेखी तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी या नालायक शिक्षकाला अटक केली असून त्याच्यावर विनयभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याच शिक्षकाने यापूर्वी नाझरे येथील शाळेत काम करत असताना देखील एका मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मात्र संस्थेने त्याला लेखी खुलासा मागितला होता. आता पुन्हा याच शिक्षकाने विनयभंगासारखे गंभीर कृत्य करून देखील संस्थेने गुन्हा दाखल करण्यास इतका उशीर का केला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


दरम्यान, या मुलीच्या कुटुंबाच्या आणि गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाणे टाळण्यासाठी अखेर हा गुन्हा दाखल झाला असल्याची चर्चा आहे. तसं असलं तरी या शिक्षकांसोबत जर त्याला कोणी पाठीशी घालीत असेल तर त्याचीही चौकशी करावी अशी मागणी पुढे येत आहे. 


ही बातमी वाचा: