Barshi Chikharde News: बीडमध्ये आंदोलनादरम्यान एका व्यक्तिचा मृत्यू झाल्यावरुन चर्चा सुरु असताना आता बार्शीत देखील एका दिव्यांग बालकाचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तीन महिन्यांपूर्वी दिव्यांग निधी मिळावा म्हणून बार्शीतल्या चिखर्डे ग्रामपंचायतीसमोर आई-वडिलांसोबत उपोषणाला बसलेल्या 13 वर्षीय वैष्णवी रामचंद्र कुरुळे हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे रामचंद्र कुरुळे यांच्या 10 वर्षीय मुलाचा देखील या आंदोलनात मृत्यू झालाय. अवघ्या तीन महिन्यात आपल्या दोन्ही मुलं गमवाल्याने बार्शीतल्या कुरुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावावर शोककळा पसरली आहे. गावातील रामचंद्र कुरळे यांनी अवघ्या तीन महिन्यात आपली दोन्ही मुलं गमावली आहेत. दिव्यांगासाठी असलेला निधी मिळाला नाही म्हणून रामचंद्र कुरुळे आणि त्यांचे कुटुंबीय ऑगस्ट महिन्यात ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. या आंदोलनात अल्पवयीन मुलगी वैष्णवी हिचा मृत्यू झाला होता. वैष्णवी हिच्या दुर्दैवी निधनानंतर संबंधितांवर कारवाई करू, तसेच निधी देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करून कुरुळे कुटुंबियांनी वैष्णवीच्या पार्थिववर अंत्यसंस्कार केले होते.
मात्र तीन महिने उलटून देखील आश्वासनाची पूर्तता न झाल्याने कुरुळे कुटुंबीय पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली. गावातील स्मशानभूमीत कुरुळे कुटुंबीय उपोषणाला बसले होते. या उपोषणा दरम्यान रामचंद्र कुरुळे यांचा अवघ्या 10 वर्षाचा मुलगा संभव याचा देखील मृत्यू झाला आहे.
खरंतर वैष्णवीच्या मृत्यूनंतर तरी प्रशासनाला जाग येणं अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही आणि दुर्दैवाने दहा वर्षाच्या संभवचा ही उपोषणातच मृत्यू झाला. संभवच्या मृत्यूला 18 तास उलटले तरी प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही.
त्यामुळे आता चिखर्डेतील ग्रामस्थ देखील आक्रमक झाले. प्रहार अपंग संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांनी अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. दोषींवर कारवाई होतं नाही तो पर्यंत मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका कुरुळे कुटुंबियांनी घेतली. त्यानंतर तहसीलदार सुनील शेरखाने, प्रांतधिकारी हेमंत निकम पोलिसांसह पोहोचले. गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले यांना सक्तीच्या रजेवर पाठवत चौकशी करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिलं आहे.
संबंधित बातम्या
नशीबी आलेल्या शारीरिक व्यंगत्वानं कठीण झालेल्या जगण्याला दिव्यांग निधीचा काहीसा आधार असतो. मात्र हा निधी मिळवण्यासाठी वैष्णवी आणि संभव या दोघांना आपला जीव द्यावा लागला हे दुर्दैव.