solapur News Updates: अपंग निधीसाठी आंदोलनाला बसलेल्या दिव्यांग मुलीचा उपोषणादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप बार्शी तालुक्यातील चिखर्डे (Barshi Chikharde) ग्रामस्थांनी केला आहे.  वैष्णवी रामचंद्र कुरुळे असे मृत दिव्यांग मुलीचे नाव आहे. दिवसभर उन्हात बसल्यामुळे उपोषणकर्त्या मुलीला त्रास झाला. त्यातूनच तिचा मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांनी दावा केला आहे. ग्रामपंचायतीच्या निधीपैकी 5 टक्के रक्कम ग्रामपंचायतीकडून अपंगांसाठी खर्ची घालण्याची तरतूद आहे. मात्र चिखर्डे ग्रामपंचायतीने अनेक वर्षापासून हा निधी खर्ची घातला नाही. या विरोधात उपोषण सुरु होते. 


निधी मिळावा म्हणून बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावातच 18 ऑगस्टपासून उपोषण


मिळालेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्टपासून निधी मिळावा म्हणून बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावातच उपोषण सुरू करण्यात आले होते. उपोषणाला गावातील दहा ते पंधरा लोक बसले होते. मात्र दिवसभर उन्हात बसल्यामुळे वैष्णवी कुरुळे हिचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. दरम्यान 3 महिन्यापूर्वी चिखर्डे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अपंग मुलांना बसवून आंदोलन केले होते.


जिल्हाधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई करतो असे आश्वासन दिले होते. मात्र दोषींवर कारवाई झालीच नसल्याने आम्ही उपोषणाला बसल्याचा उपोषणकर्त्यांचा दावा आहे.  मात्र या संदर्भात पोलिसात अद्याप कोणतीही नोंद केलेली नाही. नातेवाईकांनी पोलिसात कोणतीही तक्रार दिली नसल्याची पोलिसांची माहिती आहे. 


उपोषणाचा आणि मुलीचा मृत्यूचा संबंध नाही; प्रशासनानं आरोप फेटाळले


दरम्यान या घटनेनंतर एबीपी माझानं प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की,  मृत दिव्यांग मुलगी ही उपोषणाला बसलेली नव्हती. ती आजारी होती. त्यामुळे तिला ऍडमिट देखील केलेलं होतं. तिला डिस्चार्ज घेतल्यानंतर मृत्यू झाला आहे. उपोषणाचा आणि मुलीचा मृत्यूचा संबंध नाही, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 


बार्शी तालुक्यातील चिखर्डे हे गाव आहे. मृत मुलीचे वय 12 वर्षे आहे. तिला आणखी एक लहान भाऊ आहे. तो 10 वर्षांचा असून तो देखील दिव्यांग असल्याची माहिती आहे.


इतर महत्वाचा बातम्या


Crime : गोळीबार करत वाहन चालकाकडून तीन कोटी 60 लाख रुपये लुटले, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना


Solapur IT Raids : गेल्या 30 तासापासून सोलापुरात आयकर विभागाची छापेमारी सुरु, बांधकाम व्यावसायिकांसह वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती रडारवर