Shinde Group Pandharpur : पंढरपूर मंगळवेढ्याचे दिवंगत आमदार भारतनाना भालके यांची क्रेज आजही कायम असल्याने आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एक मास्टरस्ट्रोक खेळत भगीरथ भालके यांना गळाला लावण्याचे काम केले आहे. याचा मोठा फायदा सोलापूर लोकसभा आणि चार विधानसभा मतदारसंघात होणार असून भालके यांच्या नेतृत्वाखालील विठ्ठल परिवाराला एकत्र राहण्याचे आवाहन आज (दि.23) तानाजी सावंत यांनी केले. 


भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी मेळाव्याच्या उदघाटन समारंभात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हजेरी लावली. कार्यक्रमाला भगीरथ भालके यांनी थेट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना बोलावत भाजप आमदार समाधान अवताडे याना शह देण्याचा प्रयत्न केला होता . कार्यक्रमासाठी सांगोल्याचे दिवंगत आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ बाबासाहेब देशमुख हे देखील उपस्थित होते . 


भारतनाना आणि गणपतराव देशमुख यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही


आरोग्यमंत्री डॉ सावंत यांनी भारतनाना आणि गणपतराव देशमुख यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही,अशा शब्दांत या दोन्ही तरुण नेत्यांना साद घातली. दिवंगत आमदार भारतनाना यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना पक्षात घेऊन मोठी ताकद देण्यास सुरुवात केल्याने भगीरथ भालके यांनी आपल्या हजारो समर्थकांसह बीआरएस पक्षात प्रवेश केला होता .


तेलंगणात बीआरएस पराभूत झाल्याने भगीरथ भालके वेगळी वाट शोधत होते. अशात त्यांना शिवसेना आपली वाटू लागल्याने त्यांनी कार्यक्रमाला डॉ तानाजी सावंत याना पाचारण केले होते.'भगीरथ याने थोडी चूक केली, काखेत कळसा अशी त्यांची अवस्था झाली'असे सांगत उशाला तानाजी सावंत होते तर त्यांनी फक्त एक फोन करायला हवा होता असे सांगितले . यापुढे संपूर्ण विठ्ठल परिवार एकत्र राहा आणि काहीही गरज पडली तर हा तानाजी सावंत भारतनाना यांच्या प्रमाणे तुमच्या मागे उभा राहील,असे आश्वासन दिले . 
       


समाधान अवताडे आणि शहाजीबापू यांची काळजी वाढणार 


आरोग्यमंत्र्यांच्या या मास्टरस्ट्रोकचा फायदा सोलापूर लोकसभेसाठी मोठ्या प्रमाणात होणार असून विठ्ठल परिवाराची ताकद पंढरपूर , मंगळवेढा , मोहोळ या भागात मोठ्या प्रमाणात आहे . याशिवाय सांगोला आणि माढा या भागातही विठ्ठल परिवार असल्याने माढा लोकसभेला देखील भगीरथ भालके आणि विठ्ठल परिवार महायुतीची फायदेशीर ठरू शकणार आहे. भगीरथ भालके यांच्यासोबत भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ बाबासाहेब देशमुख यांनीही यावेळी डॉ तानाजी सावंत यांच्याशी चर्चा केली . भालके यांचा अजून शिवसेनेत अधिकृत प्रवेश झाला नसला तरी डॉ तानाजी सावंत यांच्या सोबत राहण्याचे संकेत भगीरथ भालके यांनी दिल्याने आजचा कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम महायुतीला लोकसभा निवडणुकीसाठी ताकद देणारा ठरणार आहे . असे असले तरी लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यामुळे अनेक प्रश्न उभे राहणार असून डॉ सावंत यांच्या भाषणाने भाजप आमदार समाधान अवताडे आणि शिवसेना आमदार शहाजीबापू यांची काळजी मात्र वाढणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Amol Mitkari : गाडी फोडणार, घरावर दगडफेक करणार; अमोल मिटकरींना अकोला पोलीस अधिक्षकांच्या नावाने धमकी