सोलापूर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष अॅक्टीव्ह मोडमध्ये आले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे राज्यात दौरे करताना दिसत आहेत. ते उद्या अकलूजमध्ये असणार आहेत. लोकसभेनंतर पुन्हा एकदा शरद पवार , सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा येणार एकत्र दिसणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं  लक्ष सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा जागांवर अशणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजपचं टेन्शन वाढलं आहे. 


लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार(Sharad Pawar), सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील या तीन शक्ती एकत्र आल्या आणि त्यांनी भाजपाला जोरदार झटका देत जिल्ह्यातील दोन्ही जागा भाजपकडून जिंकून घेत आपली ताकद दाखवून दिली होती. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीपूर्वी हे तीनही बडे नेते अकलूज येथे एका कार्यक्रमात एकत्र येत असून आता यांचे लक्ष सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघ असणार आहे. 


उद्या (शनिवारी) माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या होऊन गेलेल्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतनाचा सोहळा अकलूज येथे मोहिते पाटील यांनी आयोजित केला असून यावेळी शरद पवार यांच्या हस्ते व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार केला जाणार आहे. अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडासंकुल येथे हा विराट मेळावा बोलावण्यात आला असून विधानसभेपूर्वी मोहिते पाटील यांचे हे शक्ती प्रदर्शन असणार आहे . 


यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, पंढरपूर, करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ या तालुक्यात मोहिते पाटील यांची एकहाती सत्ता होती. तर सोलापूर शहर, अक्कलकोट आणि मंगळवेढा येथे सुशीलकुमार शिंदे यांची निर्विवाद सत्ता होती. या दोन बड्या नेत्यांमध्ये शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात होता. मात्र पुढे पवार व मोहिते असे गट राष्ट्रवादीत झाले आणि मोहिते पाटील यांची सत्ता केवळ माळशिरस तालुक्यापुरती उरली होती. सुशीलकुमार शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात 2014 नंतर भाजपने  जोरदार मुसंडी मारीत जिल्ह्यातील दोन खासदार व विधानसभेच्या 11 पैकी तब्बल 6 जागा जिंकत जिल्ह्यावर वरचष्मा मिळविला होता . 


यानंतर 2019 मध्ये मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर सोलापूर जिल्हापरिषद, महापालिका यासह भाजपने जिल्ह्यातील बहुतांश सत्तास्थाने ताब्यात घेतली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मोहिते पाटील यांच्यात माढा लोकसभेच्या तिकिटावरून बिनसले आणि शरद पवार यांनी मोहिते पाटील यांना पुन्हा स्वगृही आणून लोकसभा उमेदवारी दिली. याचसोबत सुशीलकुमार शिंदे व विजयसिंह मोहिते पाटील यांना एकत्र आणून माढा व भाजपचा बालेकिल्ला असणारी सोलापूर या लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकत जोरदार दणका दिला होता. आता पुन्हा उद्या हे तीन बडे नेते अकलूज येथे एकत्र येत असून  त्यांचे लक्ष विधानसभेच्या जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघावर असणार आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.