Maharashtra Solapur News: संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati) यांचा सध्या सोलापूर (Solapur News) जिल्हा दौरा सुरु असून काल (सोमवारी) रात्री सांगोल्यात विराट सभा घेत शिंदे-फडणवीस यांच्यासह सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्यावरही संभाजीराजेंनी जोरदार निशाणा साधला. संभाजीराजेंच्या सभेनंतर आमदार शहाजीबापूंच्या चिंतेत नक्कीच भर पडली आहे. थेट संभाजीराजे छत्रपती यांनी शहाजीबापू पाटील यांच्या सांगोल्यात घेतलेली विराट सभा काठावर निवडून आलेल्या शहाजी बापूंसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. 


सांगोल्यातील सभेत सरकारवर टीकेची झोड उठवताना राज्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण कधी पहिलं नसल्याचा टोलाही यावेळी संभाजीराजेंनी लगावला. फडणवीस यांचं नाव न घेता, जे चक्की पिसिंग म्हणत होते, तेच आज मांडीला मांडी लावून बसलेत, असा टोलाही संभाजीराजेंनी लगावला. 


राजकीय नेत्यांच्या भूमिकेमुळे जनता अस्वस्थ : संभाजीराजे छत्रपती


संभाजीराजे छत्रपती यांनी सांगोला येथे झालेल्या सभेत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेवर जोरदार टीका केली. राजकीय नेत्यांच्या भूमिकेमुळे जनता अस्वस्थ आहे, असं सांगताना सध्या सत्तेत शिवसेना विरोधात शिवसेना, सत्तेत राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी अशी अवस्था असून या सगळ्याची मजा पाहायचं काम भाजप करत असल्याचा टोलाही संभाजीराजेंनी लगावला आहे.  


राष्ट्रवादी आणि भाजप दोघेही सत्तेसाठी एकत्र आलेत : संभाजीराजे छत्रपती


राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची खिल्ली उडवताना राष्ट्रवादी म्हणायची आम्ही पुरोगामी विचाराचे लोक आहोत. जातीयवादी पक्षांसोबत जाणार नाही, असं सांगायचं तर भाजपवाले आम्ही राष्ट्रवादीसोबत कधीच युती करणार नाही, असं सांगायचे. आज मात्र दोघे स्वार्थासाठी एकत्र आल्याचं दिसत असल्याचा टोलाही यावेळी संभाजीराजेंनी लगावला.


गुवाहटीवरून शहाजीबापूंचा समाचार घेताना यांनी सर्वात जास्त टीका पवार कुटुंबावर केली. त्यावेळी अर्थमंत्री अजितदादा निधी देत नसल्याचं सांगितलं. पण आता मात्र निधीसाठी बापुंना याच अजितदादांकडे जावं लागणार असा टोलाही राजेंनी लगावला. बंद पडलेल्या किसान रेल वरून संभाजीराजेंनी खासदार रणजित निंबाळकर यांच्यावरही निशाणा साधत सांगोल्यातून 37 देशात डाळिंब जातं. मात्र किसान रेल्वे बंद असल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, याचे भान ठेवा असंही सभाजीराजेंनी यावेळी सुनावलं. सांगोल्यात पाण्याचं दुर्भिक्ष आहे, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचं साम्राज्य आहे. सुरू असलेली रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची असल्याची टीकेची झोड उठवली. 


दरम्यान, स्वराज्य पक्ष 2024 ला वेगळा पर्याय म्हणून उभा राहील, असा दावाही यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी केला. राजेंच्या सभांना मिळत असलेला उदंड प्रतिसाद सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीची झोप उडवणारा ठरणार आहे, हे मात्र नक्की.