Solapur : जलजीवन व स्वच्छ भारत मिशन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा, या कामात दिरंगाई झाल्यास काळ्या यादीत टाकू असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिला. तांत्रिक सहाय्य करणारी पीएमसी संस्थेस कामात दिरंगाई केलेबद्दल कारणे दाखवा नोटीस देऊन मानधन रोखणेचे आदेश दिले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात  जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भुवैज्ञानिक डाॅ. संजय कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांच्यासह गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता, विस्तार अधिकारी पंचायत व आरोग्य, बीआरसी व सीआरसी, आयएसए, पीएमसी, टीयूव्ही या सल्लागार संस्थेचे समन्वयक व कर्मचारी  उपस्थित होते. जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल या बाबी महत्वाच्या आहेत. जेजेएम मोबाईल अॅपमधून आॅनलाईन कामे पुर्ण करावीत. 330 गावात ग्रामसभा घेऊन ही कामे पूर्ण करावीत. यासाठी ठराव घ्या. व्हीडीओ घेऊन अपलोड करावे लागणार आहे. ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधा. काम पुर्णत्वाचा दाखला घ्या, अशा सुचना सीईओ मनिषा आव्हाळे यांनी दिली. 


हरघर जल यासाठी विशेष ग्रामसभा घ्या - 
 
सोलापूर जिल्ह्यात 330 ग्रामपंचायतीमध्ये 100 टक्के नळ कनेक्शन देण्यात आली आहेत. ज्या गावात अद्याप नळ कनेक्शन बाकी आहे, त्या गावात ती कामे लवकर पूर्ण करा. विशेष ग्रामसभा घेऊन दोन मिनिंटाचा व्हीडीओ व ग्रामसभा ठराव घेऊन आॅनलाईन नोंदणी करा. पाणी गुणवत्तेमध्ये काम कमी असलेले अक्कलकोट, मंगळवेढा तालुक्यांना नोटिसा देण्याच्या सुचना  मनिषा आव्हाळे यांनी दिल्या. 


….तर काळ्या यादीत टाकणार 
 
कामे वेळेत पुर्ण करा. जे ठेकेदार काम वेळेत पुर्ण करणार नाहीत त्यांना काळ्या यादीत टाकणार आहे, असा इशाराच दिला. कुठे अडचणी येतात ते मांडा. किती दिवसात कामे पुर्ण करणार याचा लेखी अहवाल द्या. थर्ड पार्टी निरीक्षणासाठी जास्त मनुष्यबळ लावा. वेळेत काम न करणारे ठेकेदारांमार्फत काळ्या यादीत टाकणेचे सुचना शासनाने दिल्या आहेत. शासनाने दिलेले सुचनांचे आम्ही पालन करत आहोत. ज्या ठेकेदारांना काम करताना अडचणी येतील, त्यांना कामात मदत करू अशी ग्वाही दिली. २० डिसेंबर पर्यंत जलजीवन मिशनच्या सर्व योजना पुर्ण करायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. ठेकेदारांच्या अडचणी जाणून घेऊन वाळू उपलब्धता, जीएसटी मधील फरक व पाईप याच्या वाढलेल्या किंमतीमधील तफावतीबाबत सकारात्मक विचार करू अशी ग्वाही आव्हाळे यांनी दिली. 


येत्या  15 ऑगस्टपर्यंत ग्रामपंचायती ओडीएफ प्लस करा  
 
येत्या १५ ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त ग्रामपंचायत ओडीएफ प्लस करा. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनची कामे वेळेत करा. ट्रायसायकल व डस्टबीनची कामे वेळेत पुर्ण करा. केंद्र शासानाच्या संकेतस्थळावर माहिती अपडेट करा. सर्व संस्थांचे प्रशिक्षण घ्या. आधी कामांची योग्य माहिती करून घ्या.