Shahajibapu Patil Exclusive : काय झाडी... काय डोंगर... काय हाटील फेम शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण यावेळी त्यांच्या चर्चेचं कारण ठरलंय ते त्यांचं घटलेलं वजन. केवळ 8 दिवसांत शहाजीबापूंनी तब्बल 9 किलो वजन घटवलं आहे. नागपूर अधिवेशनातून (Nagpur Adhiveshan) गायब झालेले फायरब्रॅन्ड आमदार शहाजीबापू नव्या रूपात जनतेसमोर येत असल्याची बातमी एबीपी माझानं (ABP Majha  Exclusive) दाखवली होती. याच विषयावर शहाजीबापूंनी एबीपी माझाशी एक्स्लुझिव्ह बातचित केली आहे. 


वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी केलेले उपचार आणि त्यामुळे त्यांच्यात झालेला बदल याबाबत शहाजीबापूंनी दिलखुलास गप्पा एबीपी माझाशी मारल्यात. एबीपी माझानं काल दिलेली बातमी तब्बल जगभरातील 42 कोटी लोकांमध्ये व्हायरल झाल्याचं शहाजी बापूंनी सांगितलं. तसेच, उपचारानंतर मला खरंच हलकं आणि मोकळं झाल्यासारखं वाटत असल्याची कबुली बापूंनी दिली. 


गेल्या आठ दिवसांत बंगळुरू येथील आश्रमात पंचकर्म, शिरोधारा, सुदर्शन क्रिया, मसाज आणि ध्यानधारणा यांमुळे माझ्या स्वभावात देखील खूप सकारात्मक ऊर्जा तयार झाली आहे. आता नव्या दमानं पुन्हा एकदा महाराष्ट्रभर विरोधकांना ठोकून काढायला तयार झाल्याचं बापूनी सांगितलं आहे. माझी भाषा बदलणार नाही, ती पहिल्यासारखीच कडक राहणार आणि त्याच भाषेत विरोधकांचा समाचार घेणार, कोणालाही सोडणार नाही, असं बापूंनी सांगितलं आहे. 


सध्या फक्त वाफेवर शिजवलेलं खाऊन कसं वाटतंय, असं विचारताच डोळे मिटून खायचं आणि आता जिभेसाठी नाही तर पोटासाठी खायचं, असं शहाजीबापूंनी सांगितलं. 


पाहा व्हिडीओ : Shahajibapu Patil : "उद्धव ठाकरेंची माणसं भाडोत्री", शहाजीबापू पाटील यांचा थेट ठाकरेंवर हल्लाबोल



ज्यांची खुर्ची गेली तीच लोक टीका करत आहेत. उद्धव साहेबांनी काही भाड्यानं माणसं ठेवली आहेत, तेच बोलतात, असा टोला सुषमा अंधारेंना शहाजीबापू पाटलांनी लगावला आहे. आपल्या अनुपस्थितीत सुषमा अंधारे यांनी सांगोल्यात येऊन टीका केली, पण ऐकायला माझे विरोधक गोळा होतात. त्या आंबेडकरवादी असून या बाईनं राम, सीता, हनुमान, कृष्ण, लक्ष्मी, द्रौपदी अशा आपल्या हिंदू देवदेवतांना नावं ठेवली नाहीत, तर शिव्या घातल्या आहेत, असं असताना त्या अचानक हिंदुत्ववादी झाल्या म्हणजे, त्यांना भाड्यानं खरेदी केलं असं आमच्या सारख्यांना वाटतं. एकदम निळा झेंडा टाकून भगवा झेंडा हातात कसा घेतला? असा सवाल केला. अंधारेंमुळे उद्धव ठाकरे यांची उरलीसुरली सहानुभूतीही संपत चालली आहे. त्यांच्या मताचा टक्का कमी होत चालला आहे. अंधारे यांच्या सभेत टिंगलटवाळी, नकला याशिवाय काय असतं आणि ऐकायला पाचशे, सातशे माणसं जमतात, फक्त टीव्ही पुरतं अंधारेंचा दौरा सुरु आहे, असा टोलाही लगावला आहे.


माझ्या बंगल्यावर सुषमा अंधारे बोलतायत, पण पोरानं 2 कोटींच कर्ज करून बंगला बांधला. पण आता रोज बँकवाले, फरशीवाले, खिडक्यांवाले उधारी मागायला येतात. तेव्हा नकोसे होतं असंही त्यांनी सांगितलं आहे. मी बंगला बांधल्यानंतरही दोन महिन्यांत माझ्या पत्र्याच्या घरातच राहत होतो. मला तिथंच शांत झोप लागते. त्या बंगल्यात गेल्यावर अवघडल्यासारखं होतं. पण बायकोनं रात्री 11 वाजता भांडण काढलं, मग मी त्या बंगल्यात राहू लागल्याचं मिश्किल उत्तरही सुषमा अंधारे यांनी दिलं आहे.