सोलापूर : माळशिरसचे गणित थोडक्यात चुकले, मात्र येत्या चार महिन्यात जनतेचे आमदार असलेले राम सातपुते हे विधान भवनात दिसतील असा दावा माढ्याचे माजी खासदार रणजीत निंबाळकर यांनी केला. येत्या चार महिन्यात राम सातपुते हे विधानपरिषदेवर निवडून जातील, तसा शब्द आपण वरून आणल्याचा दावाही त्यांनी केला. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये एका बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 


माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. महालक्ष्मी प्रतिष्ठान यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावाने देवाभाऊ केसरी बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या समारोपाच्या वेळी रणजीत निंबाळकर यांनी राम सातपुते हे आमदार होणार असल्याचे संकेत दिले. 


पुरंदावडे येथील पालखी मैदान जवळ झालेल्या या स्पर्धेमध्ये 400 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला होता. ही भव्य बैलगाडा स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांसाठी खास गॅलरी तयार करण्यात आल्यामुळे रसिकांना स्पर्धा एका जागी बसून बघता आली. 


राम सातपुते चार महिन्यात विधानभवनात असतील


राम सातपुते थोडक्यात पराभूत झाले असले तरी ते जनतेच्या मनातील आमदार आहेत असं रणजित निंबाळकर म्हणाले. येत्या चार महिन्यात राम सातपुते हे तुम्हाला विधानभवनामध्ये दिसतील असा शब्द  त्यांनी उपस्थितांना दिला.


लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमधून भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांनी राम सातपुते यांचा  पराभव केला होता. पण राम सातपुते आता विधानपरिषदेवर आमदार होणार असल्याचे संकेत निंबाळकरांनी दिले आहेत. 


गोरेंची बदनामी ही फलटणच्या नेत्याकडून


राज्याचे मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला त्यांचे नग्न फोटो पाठवल्याचा आरोप करण्यात आला. त्यावरून बुधवारचा अधिवेशनाचा दिवस गाजला. पण गोरे यांच्या बदनामीमागे फलटणचा एक विकृत नेता असल्याचा आरोप रणजित निंबाळकरांनी केला. 


जयकुमार गोरे यांना बदनाम करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील फलटणचा एक विकृत नेता षडयंत्र रचत आहे. जी केस न्यायालयात संपली आहे त्याच माध्यमातून पुन्हा एकदा अधिवेशनाच्या तोंडावर हे कटकारस्थान रचले जात असल्याचे रणजीत निंबाळकर म्हणाले.


रणजित निंबाळकर म्हणाले की, "आठ वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात तिसऱ्याच व्यक्तीने जयकुमार गोरे यांचा सोशल मीडियावरील जिम मधला एक फोटो काढून त्या महिलेला पाठवला होता. मात्र या महिलेनेही कधी जयकुमार गोरे यांना पाहिले नव्हते आणि गोरे यांनीही या महिलेला कधी पाहिले नव्हते हे स्पष्ट झाले आहे. सर्व प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर न्यायालयातून जयकुमार गोरे यांना आठ वर्षांपूर्वी निर्दोष मुक्त करण्यात आले होते."


या सर्व प्रकारामागे जयकुमार गोरे या सर्वसामान्य घरातील नेत्याच्या बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे. याच्या विरोधात आम्ही महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. या चौकशीनंतर या बदनामीच्या कटामागे असणारा विकृत नेता आणि बाकीचे लोक उघडे पडतील असा विश्वासही रणजीत निंबाळकर यांनी व्यक्त केला.


ही बातमी वाचा: