सातारा : मी थकलो नाही, डोकं अजूनही चालतंय. जोपर्यंत डोकं चालतंय तोपर्यंत काळजी करू नका, खुर्चीत बसवून संपवेन असा इशारा रामराजे निंबाळकर यांनी दिला. रामराजेंनी हा इशारा नेमका कुणाला दिला यावर चर्चेला उधाण आलं आहे. रामराजे हे फलटणमधील एका कार्यक्रमाल बोलत होते.
विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील कार्यक्रमात त्यांच्या राजकीय विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण मी 1991 साली फलटणमध्ये केलं होतं. तेव्हापासूनच आम्हाला हे चुकीचं राजकारण पटत नव्हतं. त्याकाळी विकास आणि सामान्य माणूस नव्हे तर सत्ताच केंद्रबिंदू होती. या चुकीच्या बाबी थांबवण्यासाठी आम्ही राजकारणात पडलो. आम्ही राजकारणात आल्यावर विकास केला, फलटणसाठी पाणी आणलं.
खुर्चीत बसून संपवेन, रामराजेंचा इशारा
रामराजे पुढे म्हणाले की, मी थकलो नाही. मात्र क्रिकेट खेळताना तरुणपणात पायाला लागलेलं होतं. त्यावेळचं पायाचं दुखणं आता आहे. माझं वय 77 आहे. त्यामुळं ते दुखणं त्रास देणारच. पण माझं डोकं चालतंय त्याला काय करायचं? डोकं चालतंय तो पर्यंत तुम्ही काळजी करु नका. खुर्चीत बसून संपवेन.
तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही काम केलं आहे. हा विश्वास घालवू नका एवढंच मी सांगतो असं सुद्धा रामराजे निंबाळकरांनी म्हटलं.
भाजपचे माजी खासदार रणजित निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे हे रामराजे निंबाळकरांचे कट्टर राजकीय वैरी समजले जातात. रामराजे हे अजित पवार गटाचे असले तरी लोकसभेच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटलांना मदत केल्याची चर्चा आहे. त्यामुळे रणजित निंबाळकरांचा पराभव झाला.
ही बातमी वाचा: