Solapur School News : 'इवलेसे रोप लावियेले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी' या उक्तीप्रमाणेच श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ (Shri Shivaji Shikshan Prasarak Mandal) संचलित प्राथमिक आश्रम शाळेचा (Primary Ashram School) प्रवास राहिला आहे. 27 वर्षापूर्वी म्हणजे 2 ऑक्टोबर 1996 रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील केवड या गावी माळरानावर महारुद्र मामा चव्हाण यांनी  प्राथमिक आश्रम शाळेची सुरुवात केली होती. आज या रोपट्याचे वटवृक्ष झाले आहे. कुडात सुरु केलेल्या शाळेची आज टोलेजंग इमारत पाहायला मिळत आहे. पाहुयात या शाळेचा प्रवास...





20 विद्यार्थ्यांवर सुरुवात आज शाळेत 500 विद्यार्थी


महारुद्र मामा चव्हाण यांनी 2 ऑक्टोबर 1996 रोजी गोर गरिबांच्या, ऊस तोड कामगारांच्या, भटक्या विमुक्तांच्या मुलांसाठी प्राथमिक आश्रम शाळा सुरु केली. या शाळेची सुरुवात कुडात झाली होती. त्यावेळी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्ष झाला आहे. महारुद्र मामांनी 1996 साली 20 विद्यार्थ्यांवर शाळा सुरु केली होती. आज प्राथमिक आश्रम शाळेत 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेची स्वता:ची टोलेजंग इमारत आहे. आज शाळेचा मोठा विस्तार झाला आहे. शाळेनं प्राथमिकसह माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण देखील सुरु केलं आहे. 




पश्चिम महाराष्ट्रातील पहिली ISO मानांकन मिळालेली आश्रम शाळा


श्री शिवाजी शिक्षण मंडळ संचलित केवडची प्राथमिक आश्रम शाळा ही पश्चिम महाराष्ट्रातील पहिली ISO मानांकन मिळालेली आश्रम शाळा आहे. सुरुवातीला1996 मध्ये प्राथमिक शाळेची सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू शाळेचा विस्तार होत गेला. विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली, म्हणून माध्यमिक शाळा देखील सुरु केली. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण देखील सुरु केलं आहे. आज शाळेत 350 हून अधिक निवासी मुलं मुली शिक्षण घेत आहेत. तर दिडशे मुलं मुली हे अनिवासी आहेत. गेल्या दोन वर्षापासून 10 वी 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल हा 100 टक्के लागत आहे. गुणवत्तेच्या बाबतीत आज केवडची आश्रम शाळा नामांकित आहे. या शाळेचे विद्यार्थी विविध क्रिडा प्रकारत राज्य स्तरावर शाळेचं नाव उज्वल करताना दिसत आहेत. 




युतीच्या काळात शाळेला मंजुरी, राम नाईकांचं मोठं सहकार्य


1995 साली राज्यात प्रथमच शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. या सरकारच्या काळातच शाळेला मंजुरी मिळाली. त्यानंतर 2 ऑक्टोबर 1996 साली प्राथमिक आश्रम शाळेची सुरुवात झाली. यावेळी महारुद्र मामा चव्हाण यांना माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचे मोठे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यानं शाळेला मान्यता मिळाली. यावेळी महारुद्र मामा चव्हाण यांनी राम नाईक यांचे देखील आभार मानले. 


शाळेचं नाव राज्य पातळीवर


सध्या शाळेचं नाव महाराष्ट्रात गाजत आहे. कारण शाळेचा स्वच्छ आणि पारदर्शक कारभार सुरु आहे. या शाळेचे विद्यार्थी विविध क्रिडा प्रकारात शाळेचं नाव राज्य पातळीवर गाजवत आहेत. दरम्यान, 2 ऑक्टोबर ला प्राथमिक आश्रम शाळेचा 27 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या दिवशीच शाळेचे संस्थापक महारुद्र मामा चव्हाण यांचा देखील 66 वा वाढदिवस मान्यवरांच्या हस्ते साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक शिवाजीराव सावंत, माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अॅड. मिनलताई साठे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 


महत्त्वाच्या बातम्या:


Pune School News : एक शाळा, एक शिक्षक, एकच विद्यार्थिनी; एका विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी शिक्षिकेचा डोंगरदऱ्यातून 45 किमीचा प्रवास