PM Narendra Modi Solapur Visit Today : सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज सोलापूर (Solapur News) दौऱ्यावर आहेत. सकाळी पावणे अकराच्या सुमारास पंतप्रधान मोदी (PM Modi) सोलापुरात दाखल होतील. सोलापुरातल्या कुंभारीत (Kumbhari) साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरुकडे रवाना होतील. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


कामगारांचे शहर अशी सोलापूरची ओळख आहे. आधी सूतगिरणीमध्ये काम करणारे आता वस्त्रोद्योग, विडी उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रात हजारो कामगार सोलापुरात काम करत असतात. गरिबी पाचवीला पूजलेली असताना या कामगारांना मोडक्या तोडक्या घरांमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र संपूर्ण आयुष्य झोपडपट्टीत घालवणाऱ्या या कामगारांचे स्वतःच्या हक्काचं घर स्वप्न साकार होताना पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापुरातल्या रे नगर येथे साकारत आहे. या वसाहतीच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सोलापूरला येणार असल्याची माहिती मिळत आहे.


देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत नेमकी कशी आहे? 


 350 एकर परिसर, 834 इमारती , 30 हजार फ्लॅट्स   ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत  आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 जानेवारी 2019 रोजी यांनी या प्रकल्पाचे शिलान्यास केले. जवळपास  पाच वर्षानी पुन्हा नरेंद्र मोदी आपला शब्द पूर्ण करण्यासाठी सोलापुरात येणारं आहे. आयुष्यभर झोपडपट्टीत जगणाऱ्या कामगारांना देखील स्वतःच हक्काच घर असावं. याच उद्दिष्टाने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे साकारली आहेत. सलग 4 वर्ष जवळपास 10 हजार कामगारांनी मिळून हा रे नगर हा भव्य प्रकल्प साकारला गेला आहे. केवळ डोक्यावर छत नाही तर जगण्यासाठीच्या मूलभूत सोयी सुविधा देखील पुरवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत


पंतप्रधान मोदींचा आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू दौरा 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी सुमारे 10:45 वाजता, महाराष्ट्रातील सोलापूर येथे अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. दुपारी 2:45 च्या सुमारास, पंतप्रधान कर्नाटकातील बंगळुरू येथे बोइंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन करतील आणि बोईंग सुकन्या कार्यक्रमाचा शुभारंभ करतील. त्यानंतर, संध्याकाळी 6 वाजता, पंतप्रधान तामिळनाडूमधील चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 च्या उद्घाटन समारंभात सहभागी होतील. 


पंतप्रधान मोदींच्या सोलापूर दौऱ्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त


पंतप्रधान मोदींच्या सोलापूर दौऱ्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांसह 3 हजार पोलीस आज सोलापुरात तैनात असणार आहेत. यात दोन विशेष पोलीस महानिरीक्षक, 10 पोलीस पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त, 290 पोलीस निरीक्षक/सहायक पोलीस निरीक्षक 2 हजार महिला आणि पुरूष पोलीस कर्मचारी, 108 एसपीजी कमांडो, तैनात असणार आहे. सभेला येताना मोठ्या बॅग, झेंडे, बॅनर्स, घोषवाक्य फलक, पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थ, विडी सिगरेट, तंबाखूजन्य पदार्थ, इ. सभास्थळी आणण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. 


पाहा व्हिडीओ : PM Narendra Modi Solapur Visit : पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर, रे नगर वसाहतीचं लोकार्पण