पंढरपूर: पंढरपूरच्या (Pandharpur)  विठ्ठलाचं (Vitthal Darshan) चरणस्पर्श  दर्शन 15 मार्चपासून  दीड महिन्यांसाठी बंद राहणार आहेय  विठ्ठलाच्या मंदिर गाभाऱ्याचं काम करण्यासाठी मंदिर प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या काळात रोज सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत फक्त  मुखदर्शन सुरू राहणार आहे.  यामुळे 15 मार्चपासून देवाचे पायवरील दर्शन पुढील किमान दीड महिन्यासाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. 


15 मार्चपासून सुरू होणार काम


 विठ्ठल मंदिराच्या 73 कोटीच्या विकास आराखड्याचे काम वेगात सुरू असून आता विठ्ठल व रुक्मिणी गाभाऱ्यात पुरातन रूप देण्याचे काम 15 मार्चपासून सुरू होणार आहे . यासाठी आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती , सल्लागार समिती आणि वारकरी संतांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या लाखो विठ्ठल भक्तांना दुरून काचपेटीत असणाऱ्या देवाचे मुखदर्शन घ्यावे लागणार आहे. या संपूर्ण कालावधीत देवाच्या नित्योपचार वेळी काचपेटी काढून देवाचे नित्योपचार केले जाणार आहेत. 15 मार्च ते 17 मार्च या दोन दिवसात देवाच्या गाभाऱ्यात लावलेली चांदी इन कॅमेरामध्ये काढली जाणार आहे .


भाविकांना 30 फुटांवरून मिळणार दर्शन


 17 मार्चपासून गाभाऱ्यात लावलेली ग्रॅनाईट , मार्बल क्या फारशा काढून मूळ दगडी भिंती उघड्या केल्या जातील . यानंतर गाभाऱ्यातील मूळ काळा पाषाणावर आलेले सिमेंटचे थर काढण्यासाठी वाळूच्या प्रेशरने मारा करून मूळ दगडी रूप दिले जाणार आहे .  मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी काढण्या बाबत Abp माझाने वारंवार आवाज उठवल्यावर नवीन आराखड्यात या कामाचा समावेश झाला होता . आषाढी एकादशी पूर्वी या आराखड्यातील बहुतांश कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आता दीड महिना देवाच्या पयवरील दर्शन पूर्ण बंद केले जाणार आहे .  त्यामुळे आता भाविकांना 30 फुटांवरून मुखदर्शन मिळणार आहे. 


नव्या मंदिराची उत्कंठा


ज्ञानोबा तुकाराम आदी संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर (Vitthal Temple) कसं असेल याची सगळ्यांनाच उत्कंठा लागून राहिली असली तरी लवकरच हे रूप जगभरातील विठ्ठल भक्तांना पाहायला मिळणार आहे. पूर्ण मंदिरात आता पूर्वीच्याप्रमाणे दगडी फ्लोरिंग असणार आहे. यासाठी देगलूर येथील काळ्या पाषाणाच्या खाणीतून दगड आणला जात असून हे दगड घडविण्याचं काम रात्रंदिवस करण्यात येत आहे. 


हे ही वाचा :


Pandharpur Vitthal Mandir : विठ्ठल मंदिर कात टाकतंय! काळ्या दगडाची फ्लोरिंग, 73 कोटींच्या विकास आराखड्याला जोरात सुरुवात