Pandharpur News : वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव, सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. याच मुहूर्तावर आज साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणीचा विवाहसोहळा संपन्न झाला. या आगळ्या वेगळ्या विवाहाची धामधूम आज सकाळीपासूनच पंढरपुरात सुरु झाली होती . देवाच्या या विवाहसोहळ्याला  हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविकांनी पंढरीत गर्दी केली होती . 


या विवाहसोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील भाविक भारत भुजबळ यांनी विविध रंगांची ट्रकभर रंगीबेरंगी फुलांनी लग्न मांडव अर्थात विठ्ठल सभामंडप सजवून टाकला होता. या विवाहसोहळ्याला विष्णूचे फुलांनी सजवलेले दशावतार साकारले होते. तर लग्नवेदीक मत्स्यरूपी मखरात बनवली होती. सलग दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर हा स्वर्गीय विवाहसोहळा कोणत्याही निर्बंधांशिवाय साजरा होत असल्याने मंदिर व्यवस्थापन देखील उत्साहात होते. आज प्रजासत्ताकदिन असल्याने विठ्ठल रुक्मिणीचा चौखांबी आणि सोळखांबी मंडप  तिरंगी फुलांनी सजविण्यात आला होता. 


मंदिरात आज लग्नवधू रुक्मिणीमातेला हिरवी भरजरी पैठणीं नेसविण्यात आली होती तर नवरदेव विठुरायाला देखील पांढरेशुभ्र करवतकाठी धोतर , पांढरी अंगी आणि पांढरी पगडी परिधान करून सजविण्यात आले होते . देवाच्या लग्नाचे खास वैशिष्ट्य ठरले जालना येथील भक्ताने दिलेली अनोखी आणि आजवरची सर्वात मोठी भेट. या महिला भाविकाने आपले नाव गुप्त ठेवत तब्बल 1 कोटी 78 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने विवाहभेट म्हणून विठ्ठल रुक्मिणीला अर्पण केले होते. लग्नसोहळ्याला देवाला खास चेन्नई येथून तर रुक्मिणी मातेला बेंगलोर येथून बनविलेला खास पोशाख या भक्ताने अर्पण केला होता. याचसोबत रुक्मिणीमातेकडून अतिशय मौल्यवान असा रुखवत देखील या महिला भाविकाने दिल्याने यावर्षीचा देवाचा विवाहसोहळा अतिशय लक्षणीय ठरला. 


या विवाहसोहळ्यासाठी देवाचे गाभारे देखील आकर्षक गुलाब, आर्किड आणि इतर फुलांनी अतिशय आकर्षक पद्धतीने सजले होते. आज वसंत पंचमी असल्याने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर गुलालाची उधळण करण्यात आली होती. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा गेली अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. 
            
पौराणिक इतिहासातील हा पहिला वाहिला अनोखा प्रेमविवाहाची अर्थात रुक्मिणी स्वयंवराची कथा भगताचार्य अनुराधा शेटे यांनी सांगितली. रुक्मिणी मातेचा विवाह शिशुपाल याच्यासोबत ठरला होता, मात्र मातेने श्रीकृष्णाला मनोमन वर मानले असल्याने मातेने 7 श्लोकांचे प्रेमपत्र देवाला धाडले आणि श्रीकृष्ण आपल्या वधूला नेण्यासाठी कौंडिण्यपुराला पोहोचले. याच ठिकाणाहून देवाने रुक्मिणीचे हरण करून तिला द्वारकेला आणल्याची कथा सांगण्यात अली. जगातील हे पहिले प्रेमपत्र मातेने 7 श्लोकांच्या रूपात लिहिले होते. देवाच्या लग्नाची कथा ऐकताना भजने सुरु होताच महिला तालावर ठेका धरीत आपला आनंद व्यक्त करीत होत्या . अखेर विवाह मंडपात नवरदेव विठुराया आणि नवरी रुक्मिणीमातेला आणण्यात आले . 


साक्षात देवाच्या लग्नासाठी जमलेल्या शेकडो वऱ्हाडीच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणीच्या लग्नाची सुरुवात झाली. विठ्ठल रुक्मिणीच्या सजवलेल्या उत्सव मूर्तींच्यामध्ये आंतरपाट धरण्यात आला. वऱ्हाडींना अक्षता वाटून मंगलाष्टकाला सुरुवात झाली. खुद्द परमेश्वराच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी विठ्ठल भक्तांनी मंदिरात अलोट गर्दी केली होती. शुभमंगल सावधान म्हणताच देवाच्या डोक्यावर हजारो भाविकांनी अक्षता टाकत या आगळ्यावेगळ्या विवाहसोहळ्याचे साक्षीदार बनले. सभामंडपातील सीसीटीव्हीमधून खुद्द विठुराया आणि साक्षात रुक्मिणी माता आपल्या लग्नाचा सोहळा पाहत होते . शेवटच्या अक्षता पडताच आंतरपाट बाजूला काढून देव आणि मातेला पुष्पहार घालून आरती करण्यात आली. यावेळी कथाकारांच्या सुरत महिलांनी ठेका धरत देवाच्या लग्नाचा आनंद साजरा केला. यानंतर लग्नाच्या पंगती बसल्या. देवाच्या लग्नाला बुंदीचे लाडू, जिलेबीसह पंचपक्वान्नाचे सुग्रास भोजन आज दिवसभर भाविकांना देण्यात आले.