Pandharpur News  : पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर (Vitthal Rukmini Mandir) समितीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. मंदिर समितीमध्ये आस्थापना व लेखा विभागात कार्यरत असलेले चैतन्य कुलकर्णी (Chaitanya Kulkarni) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या घटनेमुळे पंढरपुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


चैतन्य कुलकर्णी हे आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अस्थापना आणि लेख विभागात नेहमीप्रमाणे काम करत होते. दुपारी जेवण झाल्यानंतर अचानक चैतन्य कुलकर्णी यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. यामुळे त्यांचे दुर्दैवी निधन झाले. ते गेल्या अनेक वर्षांपासून हंगामी कर्मचारी म्हणून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्यरत होते. 


मंदिर विकासाचे काम वेगाने सुरु


दरम्यान, विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकासासाठी 73 कोटीच्या आराखड्याचे काम वेगाने सुरु आहेत. सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी, फ्लोरिंग काढून टाकायचे काम अंतिम टप्प्यात असून संपूर्ण मंदिराला पुरातन काळातील दगडी फ्लोरिंग बसविण्यात येत आहे. विठ्ठल गाभाऱ्यात याआधी बसवण्यात आलेल्या ग्रेनाईटमुळे गाभाऱ्यात दमटपणा जाणवत होता. यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. तर देवाच्या मूर्तीवरही विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे पुरातत्व विभागाने फारशा हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे 73 कोटींच्या आराखड्याचे काम आता वेगाने सुरु करण्यात आले आहे. 


महालक्ष्मी मंदिराचेही काम पूर्णत्वास 


तसेच विठ्ठल मंदिरातील महालक्ष्मी मंदिराचे काम बरेचसे पूर्ण झाले आहे. यामुळे आता हे मंदिर मूळ पुरातन रुपात येताना दिसत आहे. मंदिराशेजारील बाजीराव पडसाळीचेही काम अंतिम टप्प्यात असल्याने तेदेखील पुरातन रुपात आले आहे. तर देगलूर आणि कर्नाटकमधून आणलेल्या काळ्या पाषाणात घडवलेलं फ्लोरिंग बसविण्याचे काम देखील झपाट्याने सुरु आहे. विठ्ठल सभामंडपातील पेशवेकालीन भव्य सागवानी लाकडी सभामंडपालाही पॉलिश करायचे काम पुरातत्व विभाग करीत करत आहे. 


मूर्ती ठेवल्या काचेच्या पेटीत 


सध्या पुरातत्व विभाग मंदिरावर बारकाईने काम करीत असून यामुळे मंदिराला शेकडो वर्षापूर्वीचे रूप येणार आहे. यासाठी मंदिराचे जतन संवर्धन होत असून हे काम अजून दीड ते दोन वर्षे टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे. आषाढी यात्रेपूर्वी चौखांबी, सोळखांबी, गाभारा असे महत्वाच्या भागाचे काम पूर्ण करून त्याला 700 वर्षांपूर्वीच्या मूळ रूपात आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे आता देवाचे सकाळी केवळ चार तास मुखदर्शन सुरु ठेवण्यात आले आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला इजा पोचू नये, यासाठी दोन्ही मूर्तींच्यावर अनब्रेकेबल काचेच्या पेटीचे आवरण घालण्यात आले आहे. 


आणखी वाचा 


एकीकडे लोकसभेची धामधूम, दुसरीकडे दुष्काळाची टांगती तलवार; उजनी ऐतिहासिक नीचांकी पातळीवर, दररोज कोट्यवधी लिटर पाण्याचं बाष्पीभवन