पंढरपूर : पंढरपुरातील (Pandharpur) तुळशी वृंदावनातील (Tulshi Vrindawan) दुरुस्ती करुन पुन्हा एकदा भाविकांना खुले करण्यात आले आहे. एबीपी माझाच्या दणक्यानंतर तुळशी वृंदावनातील दुरुस्ती करून भाविकांना खुले झाले आहे. मात्र सर्व वारकरी संतांच्या मूर्ती उघड्यावर ठेवल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
वन विभागाने लाखो रुपयांची उधळपट्टी करीत उभारलेले तुळशी वृंदावन पुन्हा एकदा दुरुस्ती करून भाविकांना खुले केले असले तरी येथील सर्व वारकरी संतांच्या मुर्त्या उघड्यावर ठेवल्याने भाविकांच्या तीव्र नाराजी पसरली आहे . तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून पंढरपूरला येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी सहा कोटी रुपये खर्चून 2019 मध्ये हे तुळशीवृंदावन उभारले होते. भाविक आणि पर्यटकातून मोठा प्रतिसाद मिळत असताना त्याच्या निकृष्ट कामाचे परिणाम समोर आले आणि येथील संत चोखामेळा आणि संत एकनाथ महाराजांचे मंदिर दोन महिन्याच्या कालावधीत कोसळल्याने खळबळ उडाली होती. यावर विधानसभेत देखील चर्चा झाल्यानंतर वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याचा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते . यानंतर हे तुळशीवृंदावन जवळपास पाच ते सहा महिने भाविकांसाठी बंद करून याची दुरुस्ती करण्यात आली .
तुळशी वृंदावन नागरिकांसाठी आठ जानेवारीपासून खुले
तुळशी वृंदावन नागरिकांसाठी आठ जानेवारीपासून खुले करण्यात आले आहे. मात्र संतांचे जे शिल्प (मूर्ती) बसवण्यात आलेले आहेत ते उघड्यावरच असल्याने ऊन, वारा, पाऊस यामुळे त्या वारंवार खराब होण्याची, तसेच त्यांची विटंबना होण्याची शक्यता आहे. या दुरुस्तीत केवळ मंदिरे काढून नवीन मूर्ती बसवण्यात आलेल्या आहे. वास्तविक या वारकरी संतांची पूर्वी बांधलेली वजनदार संगमरवरी दगडातील मंदिरे उतरविल्यावर येथे कमी वजनाची मंदिरे उभारणे अपेक्षित होते. मात्र वनविभागाने कामात घाई करत सर्व संतांच्या मुर्त्या उघड्यावर बसवल्याने भाविकांच्या तीव्र नाराजी आहे. मुर्तीसाठी केवळ चबूतरे बनवण्यात आले आहेत.
संतांच्या मूर्ती उघड्यावर ठेवल्याने भाविकांनी तीव्र नाराजी
मूळ संगमरवरी मूर्ती काढून त्या जागी जे सिलिकॉन रबर आणि माती असे मटेरियल वापरून वजनाने हलक्या अशा मूर्ती बनवल्या आहेत त्या उघड्याच ठेवण्यात आल्या आहे. ऊन, पाऊस लागून या मुर्त्या लवकर खराब होणार आहेत . यावर कमी वजनाचे शोभेल असे मंदिर उभा करण्याची मागणी आहे . मात्र या मुर्त्या पॉलिश करणे शक्य असल्याने मूर्ती खराब होणार नाहीत अशी वन विभागाची भूमिका आहे. जे जे स्कूल ऑफ आर्टस् च्या सल्ल्यानुसार तुळशी वृंदावनातील संतांच्या मुर्त्या या सिलिकॉन रबर आणि मातीच्या मोल्डवर तयार करण्यात आलेल्या आहे. त्यांच्यावर ऊन, वारा, पाऊस याचा परिणाम होत नाही. त्यांना वारंवार पॉलीश करता येते. त्यामुळे या मूर्ती उघड्यावरच ठेवण्यात आलेल्या असल्याचे वन विभाग सांगत असले तरी भाविकांच्या भावनांचे काय असा सवाल भाविकांतून होत आहे .
क्युआर कोड स्कॅन करून मिळणार मंदिराची माहिती
वन विभागाने या तुळशीवृंदावनात क्युआर कोडच्या माध्यमातून उद्यानाची माहिती उद्यानातील भित्ती चित्र, संत मूर्ती आणि इतर सर्व गोष्टींची माहिती पर्यटकांना सहजतेने वाचता व येण्याची व्यवस्था केली आहे . यासाठी वनविभागाने प्रत्येक भित्ती चित्राजवळ क्यु आर कोड लावला आहे. ऑनलाईन पद्धतीने tulashi.solapurturis um.in या वेबसाईटचा वापर करून सर्व माहिती उपलब्ध होईल, तसेच मोबाइलमधून क्युआर कोड स्कॅन करून माहिती वाचता व ऐकता येणार आहे . या उद्यानात श्री यंत्राच्या आठ कोपऱ्यात आठ संतांच्या मुर्त्या असून विठूरायाची 20 फुटी उंच मूर्ती बसवली आहे. यमाई तलावाच्या शेजारी उभारलेली ही बाग लाखो भाविकांच्या पसंतीला उतरले असले तरी येथील सर्व संतांच्या मुर्त्या भोवती कमी वजनाची मंदिरे उभारण्याची भाविकांची मागणी आहे .