Maharashtra Yallama Devi Mandir: महाराष्ट्र (Maharashtra News) आणि कर्नाटकसह (Karnataka News) इतर राज्यातील जग जोगत्यांचे आणि भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील (Pandharpur News) कासेगावच्या यल्लमा देवीच्या यात्रेसाठी आज पहिल्या दिवशी हजारोच्या संख्येनं जोग जोगतिणी देवीचे मुखवटे घेऊन दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत देशभरातील तृतीयपंथी मातेच्या यात्रेसाठी येत असतात. दुर्दैवानं एक महिन्यापूर्वी देवीच्या मंदिरातील चांदीचा मुखवटा, प्रभावळ आणि पादुकांची चोरी झाल्यानं भाविक संतप्त होते. अजूनही पोलिसांच्या हाती देवीचा मुखवटा आणि पादुका लागलेल्या नाहीत. आता यात्रा सुरू झाल्यावर देशभरातून आलेल्या भाविकांच्या यामुळे नाराजी असून पोलिसांनी दुपारी कासेगाव आणि परिसरातून पोलीस संचालन करून कोणताही गोंधळ होणार नाही याची खबरदारी घेतली आहे.
यल्लमा देवीची कर्नाटकमधील सौदंती, कोकटनूर, जत याठिकाणी देवस्थानं असून कासेगाव येथील यात्रेला मात्र देशभरातून तृतीयपंथी येत असतात. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत अनेक वर्षाच्या परंपरांचे पालन होत असते. पंढरपूर तालुकयातील कासेगावच्या यात्रेला जवळपास 300 वर्षांची मोठी परंपरा आहे. या यात्रेचा मान कासेगावच्या देशमुख घराण्याला आहे. देशमुख यांच्या पूर्वजांना दृष्टांत झाल्याने यल्लमा देवीचे कासेगावात मंदिर बाधंण्यात आले. तेव्हा पासून यात्रेला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रातून येणारे जग आणि जोगती हे कासेगावच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य असते. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, पंजाब आदी राज्यातून जवळपास 10-20 हजार पेक्षा अधिक जोगती यात्रेच्या निमित्तान कासेगावात हजेरी लावतात. तसेच परंपरागत चालत आलेल्या आपल्या जागेवरच जोगत्यांचे जग शिस्तीमध्ये विसावतात. यात्रेच्या काळात देशमुख आणि देशपांडे यांच्या घरी देवी माहेरपणाला येते या ठिकाणी सर्वांचा मानपान होतो. यांनतर सर्व जग आणि जोगती वाजत गाजत यल्लमा देवीच्या पालखीच्या मागे गाव प्रदक्षिणा करतात.
यात्रेत आलेले सर्व जोगती यांचा समज आहे कि तिसऱ्या दिवशी देवी अग्नीत जाते आणि याच दुःखा मुळे सर्व जोगती आपल्या हातातील बांगड्या फोडून अग्नीत टाकतात. यानंतर यात्रेची सांगता होते . उद्या सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस असून उद्या देशमुख घराण्याला लिंब नेसण्याची परंपरा आहे. यंदा देवीची मूर्ती चोरीला गेल्याने या यात्रेसाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या संताप असून पोलीस याचा कसोशीने शोध घेत आहे.