सोलापूर: यंदा राज्यभर ऊस कमी असल्याने उसाच्या पळवापळवीसाठी कारखान्यांचे (Solapur Sugarcane Factory) प्रयत्न सुरु असून यातूनच टोळ्यांचीही पळवापळवी सुरु झाली आहे. याचा फटका आता ट्रॅक्टर मालकांना बसू लागला असून पंढरपूर तालुक्यातील ट्रॅक्टर चालकांना मराठवाड्यातील मुकादमानी थेट 50 कोटी रुपयांचा चुना लावल्याचं समोर आलं आहे. फसवणूक झालेल्या या ट्रॅक्टर मालकांनी आता पोलिसात धाव घेतली आहे. 


तुम्हाला टोळ्या देतो असे सांगून बीड, धुळे, परभणी, नंदुरबार, जळगावसह या भागातील अनेक मुकादमांनी या ट्रॅक्टर चालकांकडून लाखो रुपयांच्या उचली घेतल्या. आता ऊस तोडणीसाठी टोळ्याचं न आल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. मुकादमांनी केलेल्या या फसवणुकीनंतर ट्रॅक्टर मालक शेतकऱ्यांनी एकत्रित येत आज पंढरपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. 


या मुकादमांना फोन पे आणि इतर माध्यमातून ही रक्कम देण्यात आली होती. पंढरपूर तालुक्यातील जवळपास दोनशे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झालंय. या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याने या सर्व शेतकऱ्यांनी सोमवारी पंढरपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यात अनेक गोरगरीब ट्रॅक्टर मालक असून आता त्यांना कारखाने आणि फायनान्स कंपन्या पैसे वसुलीसाठी मागे लागल्याने त्यांची धाबी दणाणले आहेत. या ठकसेन मुकादमांच्या मागे त्या भागातील राजकारणी असून या फसवणुकीमागचा सूत्रधार शोधण्याची मागणी हे शेतकरी करत आहेत. 


ही बातमी वाचा: