Pandharpur News : एखादी वस्तू बाजारात विकण्यासाठी मार्केटिंग अतिशय महत्त्वाची बाब आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जातात. मार्केटिंगसाठी काय पण हे आपण नेहमीच पाहत आलो आहोत. अशीच एक भन्नाट कल्पना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने मार्केटमध्ये आणली आहे. सोलापुरातील शिवसेना (Shiv Sena) पदाधिकाऱ्याने दोन थाळ्या (Thali) ग्राहकांसाठी आणल्या. या थाळ्यांची नावं ऐकली तर नक्कीच त्याबद्दल उत्सुकता निर्माण होईल. कारण या थाळ्या राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन प्रेरित आहेत. यातील एका थाळीचं नाव आहे '40 गद्दार' तर दुसऱ्या थाळीचं नाव आहे '50 खोके एकदम ओके'. यातील '40 गद्दार' ही शाकाहारी तर '50 खोके एकदम ओके' ही मांसाहारी थाळी आहे.
पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील खर्डी येथे हॉटेल शिवम इथे या भन्नाट नावाच्या थाळ्या जेवणासाठी ठेवण्यात आल्या आहेत. '40 गद्दार' थाळी ही अवघ्या 40 रुपयांना तर '50 खोके एकदम ओके' ही मांसाहारी थाळी फक्त 50 रुपयात ठेवण्यात आली आहे. राज्यामध्ये आतापर्यंत बुलेट थाळी, बाहुबली थाळी अशा अनेक थाळ्या प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु आता राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर आलेल्या या दोन थाळ्या सध्या सर्वत्र चर्चेत येऊ लागल्या आहेत.
राज्यात सत्तांतर झाले. यानंतर शिवसेनेकडून शिंदे गटाच्या (Shinde Group) आमदारांना सातत्याने गद्दार म्हणून हिणवले गेले. याच 40 आमदारांच्या नावाने '40 गद्दार' ही शाकाहारी थाळी तयार झाली. तर विधानसभेच्या आवारात '50 खोके एकदम ओके' नावाने झालेल्या घोषणावरुन अनोखी मांसाहारी थाळी तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यातील वेगवेगळ्या थाळ्यांमध्ये शिवसेनेची '40 गद्दार' थाळी आणि '50 खोके एकदम ओके' थाळी निश्चितच चर्चेचा विषय ठरत आहे.
सांगोला रस्त्यावर असलेल्या दत्तात्रय यादव आणि बंडू घोडके यांच्या हॉटेल शिवमवर ही थाळी सध्या उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे ह्या थाळीची किंमत 40 रुपये आणि 50 रुपये अशी ठेवण्यात आली आहे. पंढरपूर तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय घोडके यांच्या संकल्पनेतून ही थाळी निर्माण करण्यात आली आहे. सांगोला मतदारसंघाचे शिवसेनेचे गद्दार आमदार शहाजीबापू पाटील यांनीही कडवट शिवसैनिकाच्या हातच्या प्रामाणिक अन्नाची चव चाखावी अशी मिश्किल टिप्पणी हॉटेल मालकाकडून होत आहे. या थाळीवर सध्या खवय्ये चांगलाच ताव मारताना पाहायला मिळत असून येथे शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी गर्दी करु लागले आहेत .