Pandharpur News : कुस्तीचा (Wrestling) सराव करताना 23 वर्षीय पैलवानाचा (Wrestler) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील (Kolhapur) तालमीत हा काल (3 ऑक्टोबर) प्रकार घडला. मारुती सुरवसे असं या पैलवानाचं नाव आहे. मारुची मूळचा पंढरपूर (Pandharpur) जिल्ह्यातील वाखरीमधील आहे. हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान मारुतीच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.


सराव झाल्यानंतर आंघोळ करत असताना छातीत दुखू लागलं 
गेल्या काही वर्षांपासून मारुती सुरवसे हा कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करत आहे. रात्री तालमीत कुस्तीचा सराव करुन आंघोळ करत असताना अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयत मारुतीचे वडील वाखरीत शेती करतात. मारुतीला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. कुस्तीमध्ये करियर करण्यासाठी त्याला कोल्हापूर येथील तालमीत सरावासाठी पाठवण्यात आलं होतं. 


गरबा खेळताना तरुणाचा मृत्यू
मुंबई पूर्व उपनगरातील मुलुंडमध्ये गरबा खेळताना दुर्दैवी घटना घडली. गरबा खेळताना शनिवारी (1 ऑक्टोबर) रात्री हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू झाला. ऋषभ लहरी मंगे भानुशाली असं मृत 27 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो डोंबिवलीचा रहिवासी होता. गरबा खेळत असतानाच त्याच्या छातीत दुखू लागलं. अॅसिडिटी झाल्याचं समजून कुटुंबियांनी त्याला थंड पेय पिण्यास दिलं. परंतु तरीही वेदना कमी न झाल्याने उपस्थितांच्या मदतीने त्याला तातडीने मुलुंडच्या आदिती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केलं.


तरुणांमधील हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये वाढ
दरम्यान या घटनांमुळे तरुणांमधील हृदविकाराच्या झटक्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहेत. यापूर्वी मैदानावर क्रिकेट खेळताना किंवा व्यायाम करताना तरुणांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यात आता गरबा खेळताना तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दुसरीकडे मुंबईमध्ये हृदयविकाराने मृत्यूंच्या संख्येत पाच पट वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 2020 साली 25 हजारांहून अधिक लोकांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी अनेक प्रसिद्ध कलाकार आणि व्यक्तींचा  हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Navratri 2022 : गरबा खेळताना अचानक छातीत दुखू लागलं, मुलुंडमध्ये तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


Navratri 2022 : हृदयद्रावक! दांडिया खेळताना मुलाचा मृत्यू, धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण