Abhijeet Patil : साखर कारखानदारी क्षेत्रातलं एक मोठं नाव असलेल्या अभिजीत पाटील (Abhijeet Patil ) यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागानं (Income Tax Department) धाडी टाकल्या आहेत. सकाळी साडेसहा वाजल्यापासून चार साखर कारखान्यांची तपासणी सुरु आहे. पंढरपूरचे मूळ रहिवासी असलेले अभिजीत पाटील हे एक बडं प्रस्थ समजले जाते. पाटील यांनी एकापाठोपाठ एक असे चार साखर कारखाने विकत घेतले आहेत. या ठिकाणीच आज आयकर विभागाची पथकं दाखल झाली असून, तपासणी सुरु करण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.


अभिजीत पाटील हे युवा उद्योजत आहेत. त्यांनी अल्पावधीच चार साखर कारखाने खरेदी केले आहे. सध्या त्यांच्या ताब्यात एकूण सहा साखर कारखाने आहे. आज त्यांच्या उस्मानाबाद, नांदेड आणि नाशिक येथील खासगी साखर कारखान्यावर आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. तसेच पंढरपूरमधील त्यांच्या कार्यालयावरही आयकर विभागानं छापेमारी केली आहे.




कारखान्यांवर धाडी टाकल्यानं खळबळ


अभिजीत पाटील हे पंढरपूरमधील एक बडे उद्योजक आहेत. तरुण उद्योजकाच्या साखर कारखान्यावर आयकर विभागाच्या धाडी सुरू झाल्याचे बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या उद्योजकाने काही वर्षातच राज्यातील चार खासगी साखर कारखाने विकत घेतले होते. अल्पावधीत साखर उद्योगातील ही प्रगती पाहून याबाबत कायमच उलट सुलट चर्चा सुरु होत्या. अशातच अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील 20 वर्षांपासून बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन गेल्या वर्षी तो यशस्वीपने चालवून दाखवला होता. 




आयकर विभागाच्या हाती नेमकं काय लागणार?


नुकतीच पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत अभिजीत पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत तो कारखाना देखील ताब्यात घेतला आहे. हा कारखाना पंढरपूर तालु्क्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा असल्याचे म्हटलं जाते. तसेच राजकीय दृष्ट्या हा कारखाना ताब्यात असणे महत्त्वाचे मानले जाते. दरम्यान, या कारखान्याची  निवडणूक जिंकल्यानंतर अभिजीत पाटील चांगलेच चर्चेत आले होते. अभिजीत पाटील यांच्यामागे राष्ट्रवादीतील बड्या घराण्याचा पाठिंबा असल्याचीही चर्चा सुरु होती. दरम्यान, आता या धाड सत्रात आयकर विभागाच्या हाती नेमकं काय लागणार?  हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अभिजीत पाटील यांना एबीपी माझाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन सध्या तरी लागत नाही.  


महत्त्वाच्या बातम्या:


'विठ्ठल'च्या निवडणुकीत सत्ताधारी भालके गटाला मोठा हादरा, 18 वर्षानंतर सत्तांतर; अभिजित पाटलांनी दिग्गजांना चारली धूळ