Pandharpur Vitthal Mandir : सदैव भक्तांची गर्दी असणारं महाराष्ट्रातलं प्रसिद्ध देवस्थान म्हणजे पंढरपूर. आता पंढरपुरातील गर्दी व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेशातल्या काशी विश्वेश्वर देवस्थानाकडून प्रेरणा घेतली जात आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं काशी विश्वेश्वर देवस्थानाला भेट दिली. तसंच तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून गर्दी व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा केली. लवकरच काशी विश्वेश्वराच्या धर्तीवर पंढरपुरात देखील गर्दी व्यवस्थापनासाठी यंत्रणा कार्यान्वीत होणार असल्याची माहिती मिळाली आहे.


पंढरीत विकास 'काशी मॉडेलसा'ठी  उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बैठक


वाराणसीमध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) आणि पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Tejaswee Satpute) यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी काशीमधील भाविकांच्या गर्दीच्या नियोजनाचं मॉडेल समजून घेतलं. पंढरपूरचा विकास काशी मॉडेलनुसार करण्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत याबाबत या अधिकारी पथकाची बैठक होणार आहे. हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना या दौऱ्याबाबत आणि मॉडेलसंदर्भात माहिती देणार आहे. 


पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. दररोजच्या भाविकांची संख्या मर्यादित असली तरी एकादशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यात आषाढी, कार्तिकीसारख्या मोठ्या एकादशीला तर पंढरीत भाविकांचा जनसागरच लोटतो. अशा वेळी गर्दीचं नियोजन करताना प्रशासनाची देखील तारांबळ उडते. शिवाय भाविकांची देखील गैरसोय होते. यात्राकाळात पंढरपूरमध्ये वाहतुकीचा देखील खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतं. शिवाय पार्किंगची देखील व्यवस्था व्यवस्थित होत नसल्यानं अडचणींचा सामना करावा लागतो. 


काय आहे वाराणसीतील काशी विश्वेश्वर मॉडेल


यामुळंच वाराणसीतील काशी विश्वेश्वर मॉडेलची पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी आणि एसपींच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ वाराणसीला पोहोचलं. काशीमध्ये देखील वर्षभर भाविकांची गर्दी असते. शिवाय सणासुदीला या गर्दीत मोठी वाढ होते. या गर्दीचं नियोजन करण्यासाठी तिथल्या प्रशासनानं एक मॉडेल बनवलं आहे. तिथं वाराणसी शहराबाहेर 16 पार्किंग स्थळं बनवण्यात आली आहेत. सोबतच 18 बॅरिअर पॉईंट बनवले आहेत, त्यामुळं गर्दीवर नियंत्रण मिळवणं सोपं झालं आहे. 


या दौऱ्यात वाराणसीच्या पोलिस आयुक्तांनी काशी मॉडेलची माहिती महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना दिली. सणासुदीच्या काळात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कशा प्रकारे वाहतुकीचं नियोजन वाराणसीत केलं जातं. गर्दीचं नियोजन कसं केलं जातं याबाबत तिथल्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.