पंढरपूर : पंढरपूर (Pandhapur) आणि विठ्ठल मंदिर (Vitthal Mandir) विकास आरखड्या संदर्भात रविवार 31 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता पाहणी केलीये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे मुख्य सचिव श्रीकर परदेशी यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन बैठक घेतली. सध्या पंढरपूर विकास आणि विठ्ठल मंदिर आराखड्याबाबत काही अडचणी असल्याने कॉरिडॉरसंदर्भात काही वाद सुरु होते. यामुळे हे प्रकल्प रखडत असल्याचं चित्र होतं. त्यामुळे आज सकाळी श्रीकर परदेशी यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद , जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांसह विठ्ठल मंदिरात येऊन बैठक घेतली .
सध्या विठ्ठल मंदिराला 700 वर्षापूर्वीचे रुप देण्याचे काम सुरु आहे. या कामाची पाहणी देखील श्रीकर परदेशी यांनी केली. यासंदर्भात मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यासंदर्भात माहिती दिली. रखडलेले प्रकल्पात सुवर्णमध्य साधून त्याला गती देण्याची जबाबदारी श्रीकर परदेशी यांच्यावर सोपवण्यात आलीये. त्यामुळे त्यांनी या सर्व प्रकल्पांची सविस्तर माहिती देखील घेतली.
विठ्ठल मंदिरात काम सुरु
विठ्ठल मंदिरात सध्या नंतरच्या काळात लागलेल्या चकचकीत फारशा काढायचे काम सुरु आहे. तसेच मूळ पुरातन दगडी फ्लोरिंग वर काढणे, दगडी बांधकामाचा दर्जा काढून मजबूतीकरण करणे अशी कामे पहिल्या टप्प्यात हातात घेण्यात आली आहेत. तसेच या मंदिरातील बाजीराव पडसाळी या भागात हे काम सुरु करण्यात आलंय. यामुळे सध्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येत आहेत. तरीही मंदिराचा हा भाग भाविकांसाठी नेट लावून बंद ठेवण्यात आलाय. सध्या रोज या भागात 30 ते 35 मजूर काम करत असून अतिशय वेगाने हे काम सुरु आहे.
150 कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी
मंदिर समितीने मूळ बनविलेला आराखडा 150 कोटींचा होता. पण शासनाने मात्र सुरुवातीला फक्त 73 कोटी 80 लाखाच्या आराखड्यास निधी दिला. त्यामुळे नुकत्याच झालेल्या कार्तिकी यात्रेत या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते . यानंतर आमदार समाधान अवताडे यांनी नागपूर अधिवेशनात मंदिर आराखड्याला पूर्ण निधी देण्याची मागणी केल्यावर यासाठी 150 कोटींच्या निधीला मंजूरी देण्यात आली होती.
संपूर्ण कायापालट होणार
विकास आरखड्याचे संपूर्ण काम पूर्ण होण्यास किमान 2 वर्षांचा कालावधी लागणार असल्याची माहिती देण्यात आलीये. याशिवाय मंदिरातील संपूर्ण फ्लोरिंग बदलणे, शिखराची डागडुजी , जुन्या पद्धतीचे नामदेव महाद्वार उभारणी , विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यातील हानिकारक मार्बल हटवून त्याला मूळ दगडी रूपात आणणे अशी कामे केली जाणार आहेत . पुढील चार ते पाच वर्षात मंदिराला संतांच्या काळातील पुरातन रूप मिळणार असले तरी दर्शन व्यवस्थेबाबत नियोजन करताना तिरुपतीच्या धर्तीवर व्यवस्था उभारल्यास भाविकांना ३० ते ४० तास दर्शन रांगेत घालविण्याची वेळ येणार नाही .तसेच लाखो रुपये खर्चून उभारलेल्या 7 माजली दर्शन मंडप पडून नव्याने खर्च करण्यापेक्षा याचाच वापर अन्य कारणासाठी करता येणे शक्य आहे का याचीही पडताळणी शासनाने स्थापत्य तज्ज्ञांकडून करून घेणे गरजेचे आहे .