Kartiki Ekadashi : राम कृष्ण हरी,आज कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi). पंढरीची वारी आहे माझे घरी। आणिक न करी तीर्थव्रत। असं म्हणत लाखो वारकरी पुण्यनगरी पंढरीत दाखल झालेत. कुणी पायी तर कुणी गाडीने मायबाप विठू-रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झालेत. ज्ञानोबा, तुकोबा, संत नामदेवांसारख्या संत महात्म्यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रातील आणि इतरही राज्यांतील वारकऱ्यांसाठी पंढरी म्हणजे माहेरच जणू... आणि त्यात याच पंढरीच्या आषाढी कार्तिकीची यात्रा म्हणजे दुधात साखरेचाच योग.
त्याच कार्तिकीच्या यात्रेनिमित्त पंढरीत वारकऱ्यांची मांदियाळी अवतरलीय. जिथं पाहावं तिथं, कच्चे-बच्चे, पोक्त बाप्ये, माय-भगिनी चंद्रभागेतीरी गोळा झालेत. वृद्ध मंडळीही दु़डक्या चालीनं या पुण्यनगरीत दाखल झालेत. टाळ-मृदुंगाचा नाद, भजन कीर्तनाचा आलाप आणि मुखी फक्त एकच नाम. विठ्ठल-विठ्ठल. पंढरपुरातील रस्ते गजबजून गेलेत. आजूबाजूला तुळशीच्या माळा, हळद-कुंकवाच्या दुकानांचा साज, असं सगळं बघत वारकऱ्यांची पावलं मंदिराच्या दिशेनं पडू लागतात. मनात ओढ एकच, विठ्ठल-रखुमाईला डोळे भरून पाहण्याची. त्यांच्या पायावर माथा टेकण्याची, विठू-रखुमाई नावाच्या आई-बापाला अलिंगन देण्याची.
इतक्यात कुठूनसा कळस दिसू लागतो आणि एकच कल्लोळ उठतो, डोळे आनंदाने पाणावतात आणि पंढरीनाथ भगवान की जय असा जयघोष आसमंतात घुमू लागतो. आषाढी कार्तिकी विसरू नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ॥ या साक्षात विठ्ठलाने घातलेल्या सादेला कृतज्ञ झाल्याने वारकरी मनामनातून कृतार्थ होत राहतात.
ही बातमी वाचा: