सोलापूर: राज्यात सध्या सुरु असलेल्या ताणतणावामुळे कार्तिकी यात्रेकडे (Kartiki Ekadashi) वारकरी संप्रदायाने पाठ फिरवली असून केवळ साडेतीन ते चार लाख भाविक दशमीपर्यंत दाखल झाले आहेत. यंदाची यात्रा विक्रमी होणार अशा अंदाजाने प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. मात्र यात्रेकरूंच्या घातलेल्या संख्येमुळे राज्यातील तणावाचा फटका कार्तिकी यात्रेला बसल्याचे समोर येत आहे. 


बुधवारी दुपारीपर्यंत यात्रेसाठी येणाऱ्या जवळपास साडेतीन लाख भाविकांसाठी मोफत निवास व्यवस्था असणाऱ्या भक्तिसागर येथे केवळ दोन लाख भाविक पोचले आहेत. मंदिर परिसर, गोपाळपूर दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट, भक्तिसागर परिसर याच ठिकाणी गर्दी दिसत असून शहरातील इतर भागात कार्तिकी यात्रेचे कोणतेही अस्तित्व दिसत नाही. विठ्ठल दर्शनासाठी गोदापालपूर येथे एकूण 14 पत्राशेडची उभारणी केली असली तरी केवळ 9 ते 10 पत्राशेडच्या बाहेर अद्याप दर्शनाची रांग गेलेली नसून दर्शनाला सध्या 12 ते 13 तास एवढाच कालावधी लागत आहे.


चंद्रभागेत दुर्गंधीयुक्त पाणी


प्रत्येक वारकऱ्यांसाठी दशमीचे चंद्रभागेचे स्नान हे पवित्र मानले जाते, मात्र यंदा उजनीतून सोडलेले पाणी अजूनही चंद्रभागेत न पोचल्याने भाविकांना पात्रात असणाऱ्या थोड्या आणि दुर्गंधीयुक्त पाण्यात स्नान करायची वेळ आली. जलसंपदा विभागाने पाणी सोडताना योग्य नियोजन केले असते तर यात्रेसाठी आलेल्या हजारो भाविकांना स्वच्छ आणि मुबलक पाण्यात स्नानाचा आनंद घेता आला असता .  


गुरुवारी रात्री बारा वाजता विठ्ठल मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात येणार असून साफसफाई झाल्यावर मंदिराची पाद्यपूजा यानंतर नित्यपूजा होईल. पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंदिरात येऊन सुरुवातीला विठूरायाची आणि नंतर रुक्मिणी मातेची महापूजा करतील. यानंतर पहाटे साडेतीन वाजता विठ्ठल मंदिराच्या 73 कोटीच्या कामाचे भूमिपूजन मंदिरातील बाजीराव पडसाळी येथे होईल. यानंतर मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी यांचा सत्कार होईल. यावर्षीही सर्व पूजा आणि इतर कार्यक्रमाच्या वेळीही मुखदर्शन सुरूच राहणार असल्याने रात्री बारानंतरही मुखदर्शन रांगेत कोणताही खंड पडणार नाही . 


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरात पोहोचले आहेत. यावेळी ते मराठा, धनगर, आदिवासी कोळी या समाजाच्या शिष्ठमंडळासह विविध शिष्ठमंडळाना भेटीसाठी वेळ देणार आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या पूजेचा विरोध संपला असला तरी पोलीस प्रशासनाने मात्र सर्व प्रकारच्या खबरदारी घेतल्या आहेत . एकंदर उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील सर्वच ठिकाणी सुरक्षा पासेस शिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही 


ही बातमी वाचा: