Pandharpur News : लाखो वारकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नमामि चंद्रभागा अभियानाचा ढोल वाजला. पंढरपुरातल्या चंद्रभागेच्या (Pandharpur Chandrabhaga River) स्वच्छतेसाठी नगरपालिका आणि मंदिर समितीकडून लाखो रुपये खर्च केले. त्यामुळे ज्या चंद्रभागेत लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने स्नान करतात, ती चंद्रभागा स्वच्छ होईल असा लोकांचा समज झाला. मात्र आजही चंद्रभागेची दूरवस्था कायम आहे. त्यामुळे स्वच्छतेवरील लाखोंचा खर्च कचऱ्यात जात असल्याचं चित्र आहे.


दूषित पाण्यामुळे अंगाला खाज, त्वचा विकाराच्या तक्रारी


लाखो वारकरी सांप्रदायाचे आराध्य असणाऱ्या चंद्रभागेची अत्यंत दूरवस्था झाल्याने भाविक संतप्त असून घाणीत पवित्र स्नान करायचे असेल तर लाखो रुपयांचे ठेके कशाला असे संतप्त सवाल भाविक विचारु लागले आहेत. विठ्ठल दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक आधी चंद्रभागेत स्नान करुन मग दर्शनाला जातो. मात्र चंद्रभागा वाळवंटात असणारी घाण आणि पात्रात असणारा गाळ यामुळे मरण यातना सोसत लाखो विठ्ठल भक्तांना स्नान करावे लागते. यातच पाण्याला येणारी दुर्गंधी सहन करुन स्नान केल्यावर या दूषित पाण्यामुळे अंग खाजणे आणि त्वचा विकार होण्याच्या तक्रारी भाविक करत असतात. पण विठ्ठलाच्या भेटीला यायचे आणि चंद्रभागा स्नान न करुन कसे चालेल असा सवाल वारकरी विचारतात.


जोगदंड महाराज यांचे मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्र्यांना खडे बोल


शासनाने चंद्रभागेच्या सफाई करण्याचे काम हाती घेण्याची मागणीही विठ्ठल भक्त करत आहेत. यातच राजरोसपणे सुरु असलेल्या अवैध वाळू खड्ड्यात भाविकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. प्रशासन केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याने आता वारकरी शिक्षण संस्था आणि संत निरंकारी मंडळ अशा धार्मिक संस्था सफाईसाठी पुढे येत आहेत. दर महिन्याला जोगदंड महाराज यांच्या या वारकरी शिक्षण संस्थेतील लहान मुले सफाई करतात. मात्र मंदिर समितीकडून लाखोंचे ठेके घेतलेले ठेकेदार काय करतात किंवा नगरपालिका प्रशासन काय करते याचे यावर मिलीभगत असलेले प्रशासन मूग गिळून गप्प बसते. म्हणूनच आता जोगदंड महाराज यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्री यांना खडे बोल सुनावले.


चंद्रभागा साफ केली तर पुन्हा आषाढी आणि कर्तिकीचा पूजेला येता येईल असे जोगदंड महाराज यांनी सांगितले आहे. खरे तर चंद्रभागेत दूषित पाणी आणि अवैध वाळू उपशावर कायमस्वरुपी तोडगा निघावा ही वारकरी संप्रदायाची मागणी असून यासाठीच जोगदंड महाराज यांनी फडणवीस यांना त्यांच्या नमामि चंद्रभागा प्रकल्पाची आठवण करुन दिली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


सुब्रमण्यम स्वामींची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, विठ्ठल मंदिर सरकारच्या ताब्यातून मुक्त करण्याची मागणी