Pandharpur Ashadhi Wari 2023: आषाढी यात्रेच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या आरोग्यतपासणी आणि उपचारासाठी पंढरपूर मध्ये राज्य सरकारच्या वतीने तीन ठिकाणी मेगा कॅम्प घेतले जाणार आहेत. त्यामध्ये साधारण: 17 लाख वारकऱ्यांची तपासणी होईल असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केला. आज डॉ. तानाजी सावंत यांनी आपल्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या तीनही आरोग्य शिबिराच्या उभारणीची पाहणी केली.
राज्यभरातून शेकडो किलिमीटर पायी चालत जवळपास 463 दिंड्या पंढरपूरकडे निम्म्यापेक्षा जास्त अंतर कापत पुढे वाट चालत आहेत . यंदा 'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' या संकल्पनेमुळे आतापर्यंत सव्वा तीन लाख वारकऱ्यांची तपासणी पूर्ण झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे आहे. या सर्व दिंड्या पंढरपूरला पोचेपर्यंत पाच लाख भाविकांची तपासणी आणि उपचार झालेले असतील असा विश्वास सावंत यांनी वाक्य केला. या प्रत्येक दिंड्यांसोबत 108 ची ऍम्ब्युलन्स आणि सुसज्ज वैद्यकीय पथके असल्याने भाविकांना तात्काळ वैद्यकीय उपचार दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यात्रा पंढरपूरमध्ये येताना पहिल्यांदा संत ज्ञानोबा, संत तुकाराम यांच्यासह महत्त्वाच्या संतांच्या पालख्या 27 तारखेला मुक्कामाला वाखरी येथील पालखी तळावर येणार आहेत. 28 जून रोजी हे सोहळे पंढरपूरमध्ये प्रवेश करतील. यंदा वाखरी येथील पालखी तळासमोर पहिला मोठा कॅम्प उभारला असून येथे जवळपास पाच हजार डॉक्टर आणि वैद्यकीय स्टाफ हजारो वारकऱ्यांवर 27 आणि 28 हे दोन दिवस तपासणी आणि उपचार करणार आहेत.
यात्रा पंढरपुरात आल्यावर भाविकांचा निवास तळ असणाऱ्या 65 एकर समोर दुसरा मेगा कॅम्प सुरु होणार असून येथे जवळपास साडेतीन लाख वारकरी निवासासाठी असल्यानं त्यांना याचा लाभ मिळणार आहे. तिसरा तळ दर्शन रांग असणाऱ्या गोपाळपूर येथे उभारला असून येथे दर्शन रांगेतील भाविकांना तपासणी आणि उपचार करून घेता येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.
या महाआरोग्य शिबिरात 32 प्रकारच्या तपासण्या आणि त्यावरील उपचाराची व्यवस्था केली जाणार असून अतिशय गर्दी असणाऱ्या ठिकाणी देखील फिरते दवाखान्याच्या मदतीने रुग्णांना तातडीचे उपचार दिले जातील असे सांगितले. यासाठी महाराष्ट्रातून आरोग्य विभागाच्या टीम पोचल्या असून याशिवाय मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या भागातील मोठा मोठ्या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर्स साधन सामुग्री आणि औषध साठ्यासह चार दिवस उपस्थित राहणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
आजवर संपूर्ण यात्रा कालावधीत यापूर्वी आरोग्य विभागाकडून 52 हजार रुग्णांची तपासणी केल्याची नोंद असून या अभियानामुळे यात्रा कालावधीत 17 लाखाच्या आसपास भाविकांची मोफत तपासणी आणि तातडीचे उपचार दिले जाणार असल्याचे डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.