Abul Sattar : आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या शेतमालाला  24 तासामध्ये पैसे द्यावे लागणार आहेत. अन्यथा शेतकऱ्यांचे (Farmer) पैसे मिळाले नसल्याची तक्रार आल्यास त्या बाजर समितीवर (Bazar Samiti) कारवाई होणार असल्याचा इशारा मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिला आहे.  प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी माल विकल्यावर जवळपास दहा दिवस ते दोन महिन्यांपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याचं निदर्शना आलं आहे. त्यामुळे बाजार समित्या आणि व्यापाऱ्यांनी नियम पाळले नाहीत तर त्यांना कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. 


प्रशासनाच्या या आदेशामुळे शेतकऱ्यांना आता त्यांचे पैसे लवकर परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांकडून अनेक तक्रारी येत होत्या. तसेच बेदाण्याचा सौदा करणारे व्यापारी सॅम्पल म्हणून दीड ते दोन किलो बेदाणे घेत असल्याची तक्रार देखील शेतकऱ्यांकडून येत होती. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होत असल्याचं सांगण्यात येत होतं. म्हणूनच आता फक्त 50 ते 100 ग्रॅम बेदाणे सॅम्पल म्हणून घेण्याच्या सूचना देखील बाजार समित्यांना देण्यात आलेल्या आहेत. सॅम्पलच्या नावाखाली बेदाण्यांची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आता कारवाई होणार असल्याचं मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. 


कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई 


राज्यात मान्सूनने उशीरा जरी हजेरी लावली असली तरी अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई करण्याची मागणी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे 31 मार्चपर्यंत ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. त्यासाठी 550 कोटी रुपये पुरवणी मागणीत मंजूर झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचं देखील मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. 


दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली नाही पण त्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना देखील मदत मिळणार आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे ऑफलाईन पंचनामे करण्यात येणार आहे. तसेच एका शेतकऱ्याला 200 क्विंटलपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तसेच प्रतिक्विंटल 350 रुपये याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला कमाल 70 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्यामुळे नुकसान झालेला कोणताही कांदा उत्पादक शेतकरी भरपाई पासून वंचित राहणार नाही असं आश्वासन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे. 


हेही वाचा : 


Maharashtra: मंत्रिपदाच्या 13 जागा मोकळ्या, पण मागणाऱ्यांची संख्या जास्त; अब्दुल सत्तारांनी दिली कबुली