सोलापूर : मी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना प्रश्न विचारले. पण त्यांनी उत्तर दिले नाही. मी प्रश्न विचारले ही चूक झाली का? तुमचा अहंकार कमी करा. आता मनोज जरांगेंच्या भूमिकेतून राजकीय वास यायला लागलाय, असा हल्लाबोल मराठा समाजाचे कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे (Annasaheb Shinde) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला आहे. 


आज बार्शीत मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी अण्णासाहेब शिंदेंच्या नेतृत्वात नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. एकीकडे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) विरुद्ध  मनोज जरांगे यांच्यात वाद सुरु असताना आता मराठा आंदोलनातील कार्यकर्तेही जरांगे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे. अण्णासाहेब शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांना बॅनर लावून प्रश्न विचारले होते.  या प्रश्नांची उत्तरे 9 सप्टेंबरपर्यंत देण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अण्णासाहेब शिंदे यांनी दिला होता. जरांगे यांनी उत्तर न दिल्याने अण्णासाहेब शिंदेच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली आहे. 


तुमच्या डोक्यात काही तरी हवा शिरलीय


या आंदोलनावेळी अण्णासाहेब शिंदे म्हणाले की,   मी मनोज जरांगे यांना प्रश्न विचारले. पण त्यांनी उत्तर दिले नाही. मी प्रश्न विचारले ही चूक झाली का? मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) खुट्टा शरद पवारांनी (Sharad Pawar) मारला आहे. तुमच्या डोक्यात काही तरी हवा शिरली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सारखा मराठा मुख्यमंत्री लाभला आहे. तो कुणबी प्रमाणपत्र मिळावं म्हणून रात्रंदिवस राबला.  राजेंद्र राऊत सारख्या माणसाच्या विरोधात तुम्ही बोलला, त्यांच्या कुटुंबातील लोकांविषयी बोललात.  बार्शी तालुक्याला सांभाळणारा ढाण्या वाघ राजेंद्र राऊत आहे. त्यांना सांभाळणारी रणरागिणी ही आमची माऊली आहे. त्यांच्या विषयी बोललात तर याद राखा, तुम्हाला बोलायला तोंड असेल तर आमच्याकडे ही तोंड आहे, असा इशारा त्यांनी यावेळी मनोज जरांगेंना दिला आहे. 


आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून दाखवतो


ते पुढे म्हणाले की, एक महिन्याची मुदत आम्हाला द्या, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून दाखवतो. मराठा आरक्षण समन्वयक समिती करून आपण काम करू.  मी समाजाचा मालक नाही, प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार राहील.  मराठवाड्यातील मराठ्याचा प्रश्न गंभीर आहे, तो प्रश्न आधी सोडवला पाहिजे.  त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे प्रश्न हाती घेऊन सोडवू.  एका महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, सर्वांना आरक्षण मिळेल.  ज्या मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत घ्या, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


मी काय समाजाचा मालक नाही


ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांच्या घरात पहिली चूल पेटली पाहिजे. शिंदे साहेब तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे, त्यामुळे एकदा होऊन जाऊ द्या, कोण खरे आहे आणि कोण खोटे आहे. तिसरा प्रश्न महायुतीला आहे, मराठा समाजाचा ईडब्ल्यूएसचा प्रश्न मार्गी लावा, केंद्राला सांगून मराठा समाजाला ईडब्ल्यूएसमध्ये घ्या. पण यांनी  ईडब्ल्यूएसला विरोध केला. ईडब्ल्यूएसमध्ये आज मुस्लिम, ब्राह्मण आणि जैन हे तीनच आहेत. ते नोकरी करत नाही. त्यामुळे सर्व लाभ आपल्याला झाला असता पण यांनी त्याला विरोध केला, पण इथे काय मोगलाई आहे का? माझ्या स्टेजवर कोणीही बसा, मी काय समाजाचा मालक नाही, असा टोला त्यांनी यावेळी मनोज जरांगेंना लगावला आहे. 


मनोज जरांगे आणि राजेश टोपे यांचे संबंध काय?


2007 पासून आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण, तुमची भाषा आता चुकतेय. तुमच्या विरोधात जास्त बोलायचं नाहीये पण आता तुमच्या भूमिकेतून राजकीय वास यायला लागलाय म्हणून आम्ही बोलतोय. एकनाथ शिंदे मराठा मुख्यमंत्री सोडून तुम्हाला दुसरा मुख्यमंत्री करणार का? मी मराठा म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. मनोज जरांगे आणि राजेश टोपे तुमचे संबंध काय? हे फक्त एकदा महाराष्ट्राला सांगा, असा सवाल त्यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. तुमचा अहंकार कमी करा. एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. मी फक्त मराठा समाजाचे काम करणार आहे. दोन दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटायला जाणार आहे. ज्यांना सोबत यायचं आहे त्यांनी घरातून भाकरी घेऊन माझ्या सोबत चला, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. 


आणखी वाचा


Manoj Jarange : मराठ्यांचा संयम सुटला तर तुम्हाला महाराष्ट्रात राहू देणार नाही; मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा