Solapur Farmers Morcha : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप (Mandrup) येथील शेतकऱ्यांचा मुंबईच्या (Mumbai) दिशेने बैलगाडी मोर्चा (Bullock cart march) निघाला आहे. आज (15 मार्च) सकाळी मंद्रूप येथील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सोलापूर शहरात मुक्काम करुन उद्या पुन्हा मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. नियोजित असलेल्या मंद्रूप एमआयडीसीच्या (MIDC) क्षेत्रात असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावरुन एमआयडीसीचे नाव काढावे आणि आमचे नाव लावावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलनाचं हत्यार उपसले आहे. 


मंद्रूपहून मुंबईच्या दिशेने निघालेले आंदोलक हे सध्या सोलापूर शहरापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर मुक्कामी थांबले आहेत. ते सकाळी 10 वाजता पुन्हा एकदा चालण्यास सुरुवात करतील. आज ते जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांची भेट घेतील. त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु करतील. 


उद्योगमंत्री सामंतांनी सूचना देऊनही जमिनीवरील बोजा उतरलेला नाही


मागील काही दिवसांपूर्वी मंद्रूप येथील या शेतकऱ्यांनी 174 दिवस आंदोलन केल्यानंतर सरकारने त्यांना आश्वासन दिले होते. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी देखील अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर देखील अद्याप या शेतकऱ्यांच्या जमिनीवरील बोजा उतरलेला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आर या पारची भूमिका घेत मंद्रूप ते मुंबई असा बैलगाडीने प्रवास सुरु केला आहे. दरम्यान, आज हे शेतकरी सोलापुरात मुक्काम करुन उद्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.


MIDC चा शेरा निघत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतच राहू


सोलापूर ते मुंबई असा बैलगाडी मोर्चा घेऊन हे शेतकरी निघाले आहेत. आमची बागायती शेती सोडून तुम्हाला कुठे MIDC करायची ते करा अशी मुख्यमंत्र्यांकडे विनंती असल्याचे शेतकरी म्हणाले. सातबाऱ्यावर असणारा MIDC चा शेरा जोपर्यंत काढणार नाही, तोपर्यंत आम्ही मुंबईतच राहू अशा इशारा शेतकऱ्यांनी दिला. आमची मुलं बाळं घेऊन आम्ही मुंबईला जात आहोत. आम्हाला खायाला सुद्धा काही नसल्याचे शेतकरी म्हणाले. आमच्या जमिनीवर MIDC चा शेरा दिल्यामुळे आम्हाला कर्ज मिळत नाही. त्यामुळे कशी शेती करायची. या सर्वांमुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.


किसान सभेचा लाँग मार्चही मुंबईच्या दिशेने


किसान सभेच्या (Kisan Sabha) शेतकरी लाँग मार्चचा (long march) आज चौथा दिवस आहे. हा मार्च मुंबईच्या (Mumbai) दिशेने येत आहे. सध्या हा मोर्च इगतपुरी तालुक्यातील घाटन देवी गावात दाखल झाला आहे. घाटन देवीतून हा मार्च आज कसारा बायपासमार्गे पुढे प्रवास सुरु करणार आहे.  दरम्यान, आज दुपारी किसान सभेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Budget Session : शेतकरी लाँग मार्चवरुन विधानसभेत गदारोळ, मागण्यांवर तात्काळ मार्ग काढा; विरोधकांची मागणी