सोलापूर :  सोलापुरात मागील तीन दिवसांपासून पंचायत राज समितीचा दौरा सुरु आहे. पंचायतींमध्ये शासनाच्या योजना योग्य पद्धतीने राबविल्या जातात की नाही याची तपासणी ही समितीतर्फे केली जाते. मात्र या समितीच्या कामापेक्षा काही सदस्यांच्या खवय्येगिरीमुळेच हा दौरा गाजला. 


पंचायत राज समितीचे सर्व सदस्य काल वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन पंचायतींच्या कामाची माहिती घेत होते. यामध्ये समितीचे सदस्य आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी एका गावात चक्क बटाटे वडे तळल्याचे पहायला मिळाले. अक्कलकोट तालुक्यातील चपळगावमध्ये बचत गटाच्या महिलांकडून हॉटेल चालवले जाते.  हॉटेलला भेट दिल्यानंतर महादेव जानकर यांनी महिलेच्या हातातील झारी घेऊन बटाटे वडे तळले. यावेळी या समितीचे सदस्य असलेल्या महादेव जानकर यांच्यासह आमदार विक्रम काळे, अंबादास दानवे हेदेखील त्यावेळी उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी महादेव जानकर हे वडे तळत असताना, "महादेव जानकर यांच्या वडे तळण्याची वेळ." अशी हेडलाईन होईल असा चिमटा काढला. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला.




समितीचे सदस्य असलेले रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांची देखील बरीच चर्चा समितीच्या कामापेक्षा इतर कारणांमुळेच जास्त झाली. काल सांगोला पंचायत समितीला भेट देण्यासाठी गेलेल्या सदाभाऊ खोत यांचा ताफा एका हॉटेल चालकाने अडवला. 2014 सालचे बिल थकवल्याचा आरोप या वेळी हॉटेल चालकाने केला. दोन दिवस हाच विषय चर्चेला असताना आज सदाभाऊ यांनी एका थ्री स्टार हॉटेलमध्ये घरगुती ठेचा-भाकरीचा आस्वाद घेतला. 




सोलापुरातल्या एका थ्री स्टार हॉटेलमध्ये सदाभाऊं खोत यांचा मुक्काम होता. सकाळी न्याहरीसाठी सदाभाऊ गेले असता एका कार्यकर्त्याने त्यांच्यासाठी घरगुती न्याहरी बांधून आणली. यावेळी हॉटेलमधील नाष्टा सोडून सदाभाऊंनी कार्यकर्त्याने आणलेल्या ज्वारीची भाकरी, ठेचा, दही आणि सोलापुरी शेंगा चटणीचा आस्वाद घेत न्याहरी केली. त्यामुळे पंचायतराज समितीच्या तीन दिवसीय दौऱ्यात कामापेक्षा नेत्यांच्या खवय्येगिरीचीच चर्चा रंगली. 


दरम्यान पंचायतराज समितीचे अध्यक्ष संजय रायमुलकर यांच्या समितीने सोलापुर जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच योजनांच्या पुर्ततेची पाहणी केली. सदस्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणांचा गुपीत अहवाल पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवणार आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Sadabhau Khot: गेल्यावेळची उधारी द्या..., हॉटेल मालकाने अडवला सदाभाऊंचा ताफा, व्हिडीओ होतोय व्हायरल