Sadabhau Khot: रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपासून आपल्या जीविताला धोका असल्याचा आरोप केला आहे. गुरुवारी कथित हॉटेल बिलाच्या थकबाकीवरून व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागे राष्ट्रवादीचा लाल टोमॅटोसारखा गाल असलेला नेता आहे  असाही आरोप खोत यांनी केला. ताफा अडवून पैसे मागणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. 


गुरुवारी,  सदाभाऊ खोत यांचा ताफा सोलापुरातील एका हॉटेल मालकाने अडवल्याची घटना घडली. गेल्या निवडणुकीवेळी राहिलेले बिल द्यावे यासाठी सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला. हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी हा ताफा अडवला. हा व्हिडिओ राज्यात चांगलाच व्हायरल झाला. सदाभाऊ खोत हे पंचायत राज बैठकीच्या निमित्ताने सांगोला दौऱ्यावर आले होते. या घटनेनंतर सदाभाऊ यांनी हे राष्ट्रवादीचे कारस्थान असल्याचे सांगत असे कोणतेही पैसे राहिले नसल्याचा दावा केला होता.


त्यानंतर आज सदाभाऊ खोत यांनी अशोक शिनगारे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेतली. अशोक शिनगारेंविरोधात विविध गुन्हे दाखल असून सोने चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती खोत यांनी दिली. शिनगारे यांच्याविरोधात चोरीसह आठ गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय चेक बाउन्स प्रकरण आणि फसवणुकीच्या आरोपाखाली शिनगारेंविरोधात गुन्हा दाखल असल्याचे खोत यांनी सांगितले. गुरुवारी व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागे टोमॅटोसारखे लाल गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा हात आहे. त्याने या व्हिडिओसाठीची तयारी केली होती. शिनगारे यांना जेवढे सांगितले होते, तेवढीच वाक्ये तो बोलत होता असेही त्यांनी म्हटले. ताफा आल्यानंतर पद्धतशीरपणे व्हिडिओ काढून व्हायरल केला असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. या नेत्याचे नाव योग्य वेळी सांगणार असल्याचे सांगितले. 


शिनगारे यांच्याविरोधात तक्रार


सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवणाऱ्या अशोक शिनगारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अटकाव केल्याचा आरोप हॉटेल मालक अशोक शिनगारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रयत क्रांती संघटनेचे सांगोला तालुकाध्यक्ष भारत चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सांगोला पोलीस ठाण्यात भादंवि कलम 341, 186, 504 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. 


दहावीचा बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर असा पाहा निकाल


यंदा तुम्हाला 'ABP Majha' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी  MH10.ABPMajha.Com  या लिंकवर क्लिक करा.