Makar Sankranti 2023 : आज सगळीकडे मकर संक्रांतीची (Makar Sankranti 2023) धामधूम सुरु आहे. नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्यामुळे सारेच उत्सुक आहेत. आज तिळगूळ वाटून 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' अशा शुभेच्छा दिल्या जातात. दरम्यान, आज या मकर संक्रातीच्या सणानिमित्त रुक्मिणी मातेस वाणवसा करण्यासाठी राज्यातील हजारो महिला पंढरपुरात (Pandharpur) दाखल झाल्या आहेत. महिला आपल्या शेतातील नवीन धान्य घेऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात (Vitthal-Rukmini temple)  आल्या आहेत.


आजच्या दिवशी तीळ गुळाबरोबरच महिलांसाठी सौभाग्याचा आणि कुटुंबाच्या भरभराटीचा सण म्हणून मकर संक्रांतीची ओळख आहे.  या दिवशी भोगी करणे, वोवसायला जाणं यासारख्या रिती , परंपरा आजही जोपासल्या जातात. त्यासाठीच राज्यभरातून हजारो महिला सध्या पंढरपूरमध्ये आपल्या शेतात पिकलेले नवंधान्य अर्पण करण्यासाठी दाखल झाल्या आहेत. भल्या पहाटेपासून मंदिर परिसर महिलांच्या गर्दीने फुलून गेला आहे. संक्रांतीमुळं आज दर्शनाची रांग थेट चंद्रभागेच्या तीरावरून पुढे गेली आहे. महिलांसोबत गैरप्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.




विठ्ठल मंदिर भोगीच्या 30 प्रकारच्या भाज्यांनी सजवले


आज मकर संक्रांतीनिमित्त पहिल्यांदाच विठ्ठल मंदिर भोगीच्या 30 प्रकारच्या भाज्यांनी सजवण्यात आले आहे. भोगीसाठी लागणाऱ्या भाज्या, फळे आणि फुलांच्या मदतीने ही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील भक्त अमोल शेरे यांच्या कुटुंबाने ही सजावट केली आहे. त्यामुळं कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे चित्र विठ्ठल मंदिरात तयार झाले आहे. शेतातील ऊस, गव्हाच्या लोम्ब्या, ज्वारी आणि मक्याची कणसे, बोरे, जांभूळ, ढाळा यासह दोडके, भोपळा, कोबी, फ्लॉवर, सिमला मिर्च अशा जवळपास 30 प्रकारच्या दीड टन भाज्यांचा या सजावटीत पहिल्यांदा वापर झाला आहे.




मंदिर परिसरात महिलांची मोठी गर्दी


विठुरायाच्या चरणी आपल्या शेतातील नवधान्य अर्पण केल्यानं भरभराट होते. आपल्या नवऱ्याचे आयुष्य वाढते यासाठी महिला हा वाणवसा करत असतात. त्यामुळं आज मंदिर परिसरात सर्व महिला वाणवसाचे ताट घेऊन रुक्मिणी चरणी हे अर्पण करत असतात. संक्रांतीला देवाचे दर्शन झाल्यावर मंदिर परिसरात या महिला एकमेकींना सौभाग्याचे वाण देत असतात. यावेळी या शेतकरी महिला पारंपरिक गाणी म्हणत फेर धरत आपला आनंद साजरा करत आहेत.  या महिला देवाला आपल्यासोबत आणलेले वाण अर्पण केल्यानंतर एकमेकींना हळदी कुंकु लावून वाण देत आहेत. यासाठी आज राज्यातील मराठवाडा, विदर्भ , कोकण, खानदेश, मुंबईसह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील महिला भाविक हजारोंच्या संख्येने पंढरपुरात दाखल झाल्या आहेत.