Maharashtra Monsoon News Updates : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून वरुणराजानं धूमशान घातलं होतं. परंतु, उजनी पाणलोट क्षेत्रात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत होतं. उजनी पाणलोट क्षेत्रात पावसानं पाठ फिरविल्यामुळे गेले 85 दिवस वजा पातळीत होतं. परंतु,  उजनी धरणानं (Ujani Dam) आज सकाळी सहा वाजता शून्य पातळी ओलांडल्यानं बळीराजाला दिलासा मिळाला आहे. गेल्यावर्षी धरण 100 टक्के भरूनही यंदा 7 मे रोजी धरण वजा पातळीत जाण्यास सुरुवात झाली होती. पाण्याचे नियोजन कोलमडत गेल्यानं धरण वजा 36 इतक्या नीचांकी पातळीला पोचल्यानं शेवटी गाळ मोरीतून पाणी सोडायची वेळ प्रशासनावर आली होती. 
   

  
यंदा पावसाळा निम्मा होत आला तरी उजनी पाणलोटक्षेत्रात समाधान कारक पाऊस न झाल्यानं अतिशय संथ गतीनं धरणाची पाणी पातळी वाढत चालली होती. गेल्यावर्षी 12 जुलै रोजी धरणानं शून्य पातळी ओलांडली असताना यावेळी मात्र 1 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागली आहे. आजपर्यंत धरणात 19.28 टीएमसी एवढं पाणी जमा झाल्यानं आज सकाळी शून्य पातळी ओलांडत धरण उपयुक्त साठ्यात पोहोचलं आहे. उजनी धरणाच्या वजा पातळीत म्हणजेच, मृत साठ्यात 63 टीएमसी पाणी साथ असतो तर धरण 100 टक्के भरल्यावर उपयुक्त साठ्यात किंवा जिवंत साठ्यात 53 टीएमसी एवढा पाणीसाठा जमा होतो. सध्या धरणाच्या उपयुक्त साठ्यात 58 टीएमसी एवढा पाणीसाठा जमा करण्याची व्यवस्था असल्यानं धरण 111 टक्के पर्यंत भरता येते.    




आता सोलापूर जिल्हा आणि उजनी पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू होण्याची वाट बळीराजा पाहत आहे. किमान शेवटच्या टप्प्यात जरी जोरदार पाऊस झाला, तर यंदा उजनी धरण 100 टक्के भरेल अशी अशा शेतकऱ्यांना आहे. उजनी धरणावर सोलापूर, पुणे, नगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील बराचसा भाग अवलंबून असल्यानं उजनी धरण पूर्णक्षमतेनं भरण्याची वाट आता हजारो शेतकरी पाहत आहेत. 


धरणाच्या पाणीसाठ्याबाबत वारंवार टीएमसी हा शब्द येत असतो. टीएमसी हा पाणीसाठा मोजण्याचं एकक असून 1 टीएमसी पाणी म्हणजे, 28 अब्ज 31 कोटी 68 लाख 48 हजार 592 लिटर पाणी होय. याच पद्धतीनं धरणात जमा होणारं पाणी किंवा धरणातून सोडणारं पाणी क्युसेक हा शब्द नेहमी येत असतो. क्युसेक हे पाण्याचा विसर्ग मोजण्याचं एकक आहे. 1 क्युसेक निसर्गाचं पाणी  म्हणजे 28. 317 लिटर पाणी प्रति सेकंद तर 1 क्यूमेक पाणी म्हणजे 1 हजार लिटर पाणी प्रति सेंकंद इतकं असतं.