सोलापूर : यंदा पंढपूरच्या (Pandharpur) वारीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' या महाआरोग्य शिबिराची जागतिक स्तरावर नोंद घेण्यात आली आहे. 'इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स' या पुस्तकात जगातील सर्वांत मोठे आरोग्य शिबिर (Health Camp) म्हणून या आरोग्य शिबिराची नोंद करण्यात आलीये. यासंदर्भातील माहिती सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी माहिती दिली आहे.
आषाढी वारीच्या निमित्तने पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तब्बल 11 लाख 64 हजार 684 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. तर याकरिता 5 हजार 700 डॉक्टरांनी वैद्यकिय सेवा बजावली. तसेच दोन लाख नागरिकांना मोफत चष्म्याचे वाटप देखील करण्यात आले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठई तब्बल 10 हजार कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
या आरोग्य शिबिरामध्ये तपासणी केल्यानंतर अनेकांना गंभीर आजाराचे देखील निदान झाले. अशा लोकांना पुढील उपचारांसाठी मोफत उपचाराची सोय देखील राज्य शासनाकडून करण्यात आली. या कार्याची दखल घेऊन या शिबिराची जागतिक स्तरावर नोंद करण्यात आली आहे. अशा माहिती संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी दिली. दरम्यान विठ्ठलानेच आमच्याकडून ही सेवा करुन घेतली अशी प्रतिक्रिया शिवाजीराव सावंत यांनी यावेळी दिली आहे.
वारकरी संप्रदायाचा आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद
आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वात मोठी यात्रा ही पंढपुरात भरते. त्यानिमित्ताने लाखो वारकरी पंढपुरात येत असतात. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून राबवण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराला वारकरी संप्रदायाने देखील मोठा प्रतिसाद दिला होता. तर कार्तिकी एकादशीच्या वेळेस देखील आमच्यासाठी मोफत तपासण्या आणि उपचार करण्याची मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या उपक्रमामुळे भाविकांना देव दर्शनासोबत मोफत तपासणीचा देखील फायदा घेता आला. त्यामुळे वारकरी संप्रदायासह पंढपुरातील जनतेने देखील मुख्यमंत्री शिंदेंचे आभार मानले.
आषाढी एकादशी निमित्त पहिल्यांदाच शिंदे फडणवीस सरकारने पालखी सोहळे निघाल्यापासून वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी ही योजना राबवली. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवल्यापासून या तपासण्यांना सुरुवात झाली होती. या संपूर्ण आरोग्यशिबिराची जबाबदारी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांच्यावर सोपवण्यात आली होती. या शिबिराचा अहवाल देखील राज्य शासनाकडून देण्यात आला होता.