Madha Crime : माढ्याच्या (Madha Crime) प्रांताधिकार्यावर वाळू माफीयांकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळू माफियांनी प्रांत अधिकाऱ्याची गाडी अडवून शिवीगाळ व धक्काबुक्की केलीये. महिला प्रांताधिकार्यांना वाळू माफीयांनी मध्यरात्री अडवल्याचं समोर आलंय. ही घटना माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळ (Tembhurni Crime)घडलीये. या प्रकरणी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अधिकची माहिती अशी की, सध्या सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांनी हैदोस घातला असून कारवाई केलेल्या महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला करण्याची मजल या वाळूमाफियांची पोचली आहे. माढा तालुक्यातील वरवडे गावच्या शिवारात अवैध वाळू उपशावर प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर या गेल्या होत्या यावेळी त्यांनी वाळू उपसा करणाऱ्या एका टिप्परवर रात्री कारवाई केली आणि तो जप्त करून परत घेऊन निघाल्या होत्या. हा वाळूचा टिपर घेऊन सोलापूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरून परत जात असताना वाळू माफी यांनी रात्री साडेबारा ते पावणेदोन दरम्यान प्रांत अधिकाऱ्यांच्या गाड्या अडवल्या. प्रांत आणि सोबतचे कर्मचारी जात असताना आण्णा पाटील रा.शिराळ यांने त्यांचे फॉरच्युनर नंबर (एम.एच.42 बी.3396) व आप्पा पराडे यांने त्याची पांढरे रंगाची अलकायझर कार ही आडवी लावून महिला उपजिल्हाधिकाऱ्यांच्या गाड्या रोखल्या. यावेळी यातील आरोपी अण्णा पाटील याने महिला प्रांत अधिकाऱ्यांना हाताने धक्का बुक्की केली. यानंतर फिर्यादी किसन बोटे याने टेंभुर्णी पोलीस स्थानकात आरोपी अण्णा पाटील, आप्पा पराडे आणि टिपर चालक गणेश केदार याच्या विरोधात फिर्याद दिली.
महिला प्रांताधिकारी यांनी केलेल्या कारवाईत वीस लाख रुपयाचा सहा चाकी बिन नंबरचा टिपर आणि 28 हजाराची वाळू जप्त केली होती. अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या माफीयांची कारवाईस आल्यानंतर आता थेट महिला उपजिल्हाधिकारी यांच्यावर हल्ला करण्यापर्यंत मजल पोचली आहे. या वाळू माफियांना पोहोचायचे काम काही अधिकारी करीत असल्याने महिला वरिष्ठ अधिकाऱ्यावर हल्ला करणे किंवा धमकवण्याची मजल करण्याचे धाडस हे वाळूमाफिया करू लागले आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचा अवैध वाळू उपशाचा गोरज धंदा राजरोसपणे सुरू आहे. अशा वैद्य कामावर कारवाईला गेलेल्या महिला अधिकाऱ्यावर देखील हल्ला करायला हे माफिया आता घाबरत नसल्याने यावर मोठी सफाई मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. वाळू माफियांवरील कारवाई करताना महिन्यात एखाद्या ठिकाणी छापा टाकला जातो आणि थोडाफार मुद्देमाल जप्त केल्याचे दाखवले जाते मात्र यावेळी कोणत्याही वाळू माफियांवर गुन्हे दाखल होत नसल्याने या माफी यांची हिम्मत वाढत चालली आहे. आता तरी पोलीस अधीक्षकांनी वाळूसाठी अतिशय कठोर पावले उचलली तरच चांगले अधिकारी शासकीय ध्येयधोरणाप्रमाणे काम करू शकतील.
आज सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारायला निघालेल्या जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात कोठेही माफियागिरी अथवा गुंडगिरी खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे. मात्र दोनच दिवसांपूर्वी राज्याचे दुसरे मंत्री विखे पाटील यांनी वाळू माफियांवर कारवाई करताना थोडा विचार करा ती आपलीच लोकं आहेत असे विधान करीत वाळू माफियांना अभय देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता या वाळू माफियांना व्यसन नाही घातल्यास महिला अधिकाऱ्यांना वाळूवर कारवाई करायला गेल्यावर असे हल्ले सोसावेच लागतील याची जाण जिल्हा प्रशासनाने ठेवावी.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा