Solapur News : सोलापुरातील (Solapur) प्रसिद्ध असणाऱ्या लोकमंगल समूहातर्फे (Lokmangal Group) दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची (State Level Literary Awards) घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या लोकमंगल साहित्य पुरस्कारासाठी शांता गोखले (मुंबई), राजू बाविस्कर (जळगाव) आणि वसंत गायकवाड (पुणे) यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी दिनांक 7 जानेवारी रोजी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याबाबतची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रोख 25 हजार रुपये, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असं या पुरस्काराचं स्वरूप
यंदाचे लोकमंगल फाऊंडेशन आयोजित, लोकमंगल साहित्य पुरस्कार शनिवारी घोषित करण्यात आले. लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2023 करिता निर्मला पाटील यांचे आत्मकथन या पुस्तकाकरिता शांता गोखले यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. तर काळ्यानिळ्या रेषा या आत्मचरित्रसाठी राजू बाविस्कर यांना आणि गौतमबुद्ध या कादंबरी करिता वसंत गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. रोख 25 हजार रुपये, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असं या पुरस्काराचं स्वरूप असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.
साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येणारा पुरस्कारसाठी कलासक्त, पुणे यांच्या 'केल्याने भाषांतर' या त्रैमासिकाची निवड करण्यात आली आहे. 25 हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असं पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच सोलापूरच्या साहित्यकांना देखील वाव मिळावा म्हणून या सोलापुरी साहित्याला देण्यात येणारा यंदाचा पुरस्कार सोलापुरातील प्रसिद्ध लेखक समीर गायकवाड यांच्या झांबळ या कथा संग्रहाची निवड करण्यात आली आहे. रोख 11 हजार रुपये, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असं पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्कार निवड समितीचे सदस्य म्हणून नीतिन वैद्य, प्रा. डॉ. ऋचा कांबळे, शिरीष देखणे आणि डॉ. दत्ता घोलप यांनी काम पाहिलं. तर या पुरस्कारासाठी समन्वयक म्हणून शोभा बोल्ली या काम करीत असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. दरम्यान 7 जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने साहित्य सांस्कृतिक प्रेमींनी उपस्थित रहावे, असं आवाहन लोकमंगल साहित्य पुरस्कार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: