सोलापूर: लाजेलाही लाज वाटणारी आणि नरकानेही आपल्या नाकाला पदर लावावा अशी दुर्गंधी येणारी वाक्ये आव्हाडांच्या तोंडात होती, यापुढे बाबासाहेबांवर (Dr Babasaheb Ambedkar) पुन्हा बोललात तर याद राखा अशा सज्जड दम भाजप प्रवक्ते आणि माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना दिला. जितेंद्र आव्हाडांनी नागपुरात केलेल्या वक्तव्याचा प्रा. ढोबळे यांनी चांगलाच समाचार घेतला. 


न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन आंबेडकरांनी 80 टक्के समाजावर अन्याय केल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना भाजप प्रवक्ते प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनीही जितेंद्र आव्हाडांवर सडकून टीका केली. 


काय म्हणाले लक्ष्मण ढोबळे? 


लाजेलाही लाज वाटेल आणि नरकालाही नाकाला पदर लावावा लागेल अशी दुर्गंधी येणारी वाक्ये जितेंद्र आव्हाडांच्या तोंडातून येत आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय अभ्यास करून ही घटना तयार केली. अगदी एखाद्या समाजाला पुन्हा आरक्षण घेण्याची वेळ आल्यास त्यांनाही ते घेता यावे अशी तरतूद देखील डॉ. बाबासाहेबांनी केली आहे. बाबासाहेबानी देशातीळ 80 टक्के समाजावर आरक्षणाची तरतूद करून उपकार केले असताना चारित्र्यशून्य संस्कारात वाढलेला भाई जितेंद्र आव्हाड हा वाटेल तशा पद्धतीच्या वल्गना करत सुटला असल्याचा टोला ढोबळे यांनी लगावला. आमच्या दैवतावर या पद्धतीने पुन्हा बोलाल तर याद राखा, याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल असा इशाराही ढोबळे यांनी दिला. 


काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?


नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाडांनी हे वक्तव्य केलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायपालिकेमध्येही आरक्षण ठेवायला हवं होतं. माहीत नाही, मी हे बोलावं की नाही, कारण उगाच वाद निर्माण होईल. मात्र तरीही बोलतो असे सांगून आव्हाड यांनी जातीय दृष्टीकोनातून न्यायपालिकेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्यायपालिकेमध्येही आरक्षण असायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली. न्यायपालिकेचे काही निर्णय असे असतात की ते पाहून लगेच त्यातून जातीयतेचा वास येतो. मात्र, न्यायपालिकेतून असे मुळीच अपेक्षित नाही. न्यायपालिका निष्पक्ष राहिली पाहिजे अशी राज्यघटनेची अपेक्षा आहे. मात्र, खरंच असे आहे का असा सवाल ही आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला.  


ही बातमी वाचा :