Jitendra Awhad News : जितेंद्र आव्हाड यांनी न्यायव्यवस्थेवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अतिशय वादग्रस्त विधान केलंय. न्यायव्यनस्थेत आरक्षण न देऊन बाबासाहेबांनी 80 टक्के समाजावर अन्याय केला, असं आव्हाड म्हणाले. नागपुरात (Nagpur News) एका कार्यक्रमात ते बोलत होते. आज न्यायपालिका निष्पक्ष नाही, न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जातीव्यवस्थेचा वास येतो असंही आव्हाड म्हणाले. दरम्यान, प्रभू श्रीराम मांसाहारी होते असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकारण खवळून निघाले. जितेंद्र आव्हाड यांनी त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती.
आज न्यायपालिका निष्पक्ष नाही. न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जातीव्यवस्थेचा वास येतो असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. जितेंद्र आव्हाड नागपुरात आयोजित केलेल्या सामाजिक परिषदेत बोलत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायपालिकेमध्येही आरक्षण ठेवायला हवं होतं. माहीत नाही, मी हे बोलावं की नाही.. कारण उगाच वाद निर्माण होईल. मात्र तरीही बोलतो असे सांगून आव्हाड यांनी जातीय दृष्टीकोनातून न्यायपालिकेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्यायपालिकेमध्येही आरक्षण असायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली. न्यायपालिकेचे काही निर्णय असे असतात की ते पाहून लगेच त्यातून जातीयतेचा वास येतो.मात्र, न्यायपालिकेतून असे मुळीच अपेक्षित नाही. न्यायपालिका निष्पक्ष राहिली पाहिजे अशी राज्यघटनेची अपेक्षा आहे. मात्र, खरंच असे आहे का असा सवाल ही आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला.
मोदी सरकारवर हल्लाबोल -
ज्या रामाच्या मंदिराचे उद्घाटन होत आहे, त्यांनी तर शबरीची उष्टे बोरेही खाल्ली होती. त्या रामाने कधीच आदिवासींना बाजूला केले नव्हते. मात्र मोदी सरकार कुठेही राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना समोर आणत नाही. त्यांना दारामागे बंद केले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलवायला हवे होते असेही आव्हाड म्हणाले.
फक्त एका आदिवासी महिलेला आम्ही राष्ट्रपती केलं, हे देशासमोर मिरवायला मोदींनी त्यांना राष्ट्रपती केले असल्याची टीका यावेळी आव्हाड यांनी केली. संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेलाही द्रोपदी मुर्मू यांना टाळले गेले. संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळेला राष्ट्रपतींना टाळून साधू महात्मांना बोलावण्यात आले.याची आठवणही आव्हाड यांनी करून दिली.
आता तरी बहुजनांनो जागे व्हा
केंद्र सरकारने तिसऱ्यांदा जॉइंट सेक्रेटरी या उच्च पदाकरीता डायरेक्ट भरती घेऊन १९ पदे भरली आहेत जी सर्व अभिजन वर्गातील आहेत. हे बरं आहे तुमचं . आमच्या बहुजनांच्या पोरांनी प्री द्यायची ,मेन्स द्यायची , इंटरव्ह्यू द्यायचा आणि वर्षानुवर्षे निकालाची पण वाट पहायची आणि नंतर जॉईंट होण्याकरिता किती वर्षे वाट पहावी लागते हे जगजाहीर आहे...पण यांचे ना परिक्षा ना मुलाखत डायरेक्ट जाॅईंट सेक्रेटरी सारखी महत्वाची पदे. यांचा अमृतकाल बहुजनांचा विनाशकाल. शेवटी कार्ल मार्क्सने भिती व्यक्त केलीच होती वर्ग संघर्षाचा इतिहास हेच भांडवल शाहित भविष्य ठरेल.आता तरी बहुजनांनो जागे व्हा, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.