पंढरपूर, सोलापूरकार्तिकी यात्रेसाठी (Kartiki Ekadashi) येणाऱ्या भाविकांना विठुरायाच्या प्रसाद म्हणून बुंदीच्या लाडूला भाविकांतून मोठी  मागणी असते. या वर्षी मंदिर समितीने कार्तिकी यात्रेसाठी 10 लाख लाडू बनविले असून मागणी वाढल्यास गरजेनुसार जादाचे लाडू बनविण्याची तयारी केली असल्याचे मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.


 यंदा विक्रमी कार्तिकी यात्रा भरण्याचे अंदाज असून आज नवमीला गोपाळपूर येथील 9 पत्रा शेड भाविकांनी भरून गेली आहेत. दर्शनाला येणाऱ्या भाविक वारी करून परत जाताना लाडूचा प्रसाद नेत असतो . सध्या रोज दीड ते दोन लाख लाडुंची विक्री होत आहे. मंदिर समितीच्या लाडू निर्मिती केंद्रात 14 नोव्हेंबर पासून हे लाडू बनविण्याचे काम सुरू आहे. 


गेल्या  काही वर्षांपासून विठुरायाच्या प्रसाद म्हणून हा बुंदीचा लाडू भाविक यात्रेनंतर आपल्या गावाकडे घेऊन जात असतो. आपल्या लाडक्या विठुरायाच्या सर्वोच्च उत्सव असलेल्या या यात्रेत हे लाडू प्रसाद म्हणून सोबत गावाकडे घेऊन जायची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून येथे रूढ झाली आहे. मात्र या यात्रा काळात 10 ते 12 लाख भाविक येत असल्याने या लाडू विक्रीचा मोठा ताण प्रशासनावर असतो. सध्या मंदिर समितीने स्वतः लाडू बनवित असून भाविकांना दर्जेदार लाडू प्रसाद देण्याचा समितीचा प्रयत्न आहे.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार पूजा


कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये (Pandharpur) विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्र्यांना शासकीय पूजा न करू देण्याचा इशारा मराठा समाजाने (Maratha Community) दिला होता. मात्र, प्रशासनाकडून सुरू असलेल्या सततच्या चर्चेनंतर आता मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना विठुरायाची पूजा करता येणार आहे. मराठा समाजाच्या आंदोलकांनी प्रशासनासमोर पाच मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यांवर सकारात्मक उत्तर सरकारकडून आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना पूजा न करू देण्याचे आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडणार आहे. या दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत 30 मिनिटे चर्चा करणार आहेत. 


गेल्या काही दिवसापासून मराठा आंदोलकांच्या भूमिकेमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र, सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूरमध्ये येताच प्रशासनाची सूत्रे वेगाने हालू लागली. एका बाजूला उपमुख्यमंत्र्यांच्या महापूजेवरून मराठा आंदोलकांमध्ये दोन गट पडले असताना दुसऱ्या बाजूला आदिवासी कोळी समाजानेही उपमुख्यमंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत पंढरपुरात न येऊ देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे पुन्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. त्यानंतर प्रशासनाने मराठा आरक्षण आंदोलकांच्या सगळ्या गटांसोबत चर्चा केली. 


मराठा समाजातील विविध गट एकत्र आल्याने तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मराठा आंदोलकांसोबत सोमवारी रात्री उशिरा संपलेल्या बैठकीत दोन्ही गट एकत्र आले. या बैठकीत खूप सकारात्मक चर्चा झाल्याने मंगळवारी, 21 नोव्हेंबर रोजी प्रशासनासोबत एकत्रित मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली. 


Pandharpur : कार्तिकी एकादशीसाठी 10 लाख बुंदीचे लाडू